मनोज जरांगेंना भुजबळ नावाची कावीळ झाली आहे अशी बोचरी टीका ओबीसी समाजासाठी लढा उभा करणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापतो आहे. कारण सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे त्यासह आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगेंनी आंदोलन सुरु केलं आहे. त्यांनी या मागणीच्या अंमलबजावणीसाठी सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. दुसरीकडे ओबीसी बांधवांवर अन्याय होता कामा नये अशी भूमिका घेत लक्ष्मण हाकेंनीही उपोषण आंदोलन सुरु केलं होतं. सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी ते मागे घेतलं. आता लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंवर टीका केली.
मनोज जरांगेंनी २५ जून रोजी भुजबळांबाबत काय म्हटलं होतं?
“छगनभाऊ, तुला असा इंगा दाखवतो, तू आमच्या आमच्यात काडी लावतो का? मी तुझ्यापेक्षा जास्त पुढचा आहे. तू बळच रक्त जाळतो आहेस. बेट्या तुझा टांगा उलटवणार. तू जेवढं करशील तेवढा मराठा एक होत जाईल.” असं म्हणत भुजबळांवर मनोज जरांगेंनी पु्न्हा टीका केली आहे. “कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण बिघडायचं आणि रोष व्यक्त करायचा. आपल्याला एकमेकांचे चेहरे बघायचे आहेत, रामराम घालायचा आहे, शेतात एकमेकांना काही अडचण आली तर मदतीला जायचं आहे याच भूमिकेत आपल्याला राहायचं आहे. हे विसरु नका.” असं जरांगे म्हणाले होते. आता लक्ष्मण हाकेंनी त्यांना जोरदार उत्तर दिलंय.
मनोज जरांगेंचा भुजबळांवर आरोप
“मातेरी गावात डीजे वाजवण्यावरुन दगडफेक झाल्याची माहिती कळली आहे. हा प्रकार घडवून आणला गेला आहे अशी शंका दिसते. ओबीसी आंदोलनसाठीही छगन भुजबळांना माझंच गाव सापडलं का? आंतरवली सराटीत माझ्याच आंदोलनापुढे आंदोलन करायला लावलं. आमचा आंदोलनाला विरोध नाही. पण दंगल झाली पाहिजे, जातींमध्ये तेढ निर्माण झाली पाहिजे असा यामागचा हेतू. छगन भुजबळांना दगडफेक करण्याचा नाद आहे. त्यातून हे घडवलं गेलं.” असा आरोप मनोज जरांगेंनी केला. ज्यानंतर मनोज जरांगेंनी चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्यावं असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी टोलेबाजी केली.
मनोज जरांगेंना भुजबळ नावाची कावीळ
“मनोज जरांगेंना भुजबळ नावाची कावीळ झाली आहे. त्यामुळे कुठेही काहीही झालं तर त्यांना छगन भुजबळ यांचंच चित्र दिसतं. पुढच्या काही कालावधीत त्यांनी चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन इलाज केले पाहिजेत. कावीळ अशीच वाढत गेली की काय होतं तुम्हाला माहीत आहे. महाराष्ट्राला माहीत आहे. मनोज जरांगेंनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, चांगली ट्रीटमेंट घ्यावी ही माझी विनंती आहे.” असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.