मराठा अरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला आज (२७ जानेवारी) यश मिळालं आहे. शुक्रवारी मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचा अध्यादेश जरांगेंच्या हाती सोपवला. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांना फळांचा रस देऊन त्यांचं उपोषण सोडायला लावलं. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यावर आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकाश शेंडगे म्हणाले, “या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आम्ही येत्या सोमवारी किंवा मंगळवारी राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे आमचं गाऱ्हाणं मांडणार आहोत हे सरकार मागसवर्गीयांच्या हक्कांचं संरक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरलं आहे. त्यामुळे यांना सत्तेतून पायउतार व्हायला लावावं, अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत.” शेंडगे यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

ओबीसी नेते म्हणाले, छगन भुजबळ हे राज्य सरकारमध्ये ओबीसींच्या बाजूने लढत आहेत. परंतु, त्यांना कोणाचीही साथ मिळत नाही. त्यांच्या पक्षातला एकही नेता मनोज जरांगेंच्या विरोधात बोलत नाही. तसेच भाजपा नेतेही शांत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेदेखील गप्प बसलेत, फडणवीसही गप्प आहेत. आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची वेळ मागितली होती. परंतु, मागच्या वेळी ते आम्हाला भेटले नाहीत. आता पुन्हा एकदा आम्ही त्यांच्याकडे वेळ मागितली आहे. ओबीसींच्या आरक्षणाबाबत फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी आमची मागणी आहे.

राज्य सरकारविरोधात आक्रमक होत प्रकाश शेंडगे म्हणाले, आम्हाला ओबीसींचं आरक्षण टिकवण्यासाठी राजकीय लढाई लढावी लागेल असं दिसतंय. आम्ही रस्त्यावरची लढणारच आहोत. महाराष्ट्रभर आक्रोश आंदोलन करणार आहोत. तसेच मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या सर्व आदेशांची आम्ही होळी करणार आहोत. यासह आम्ही न्यायालयीन लढाईदेखील लढणार आहोत.

हे ही वाचा >> “ते गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत”, मनोज जरांगेंच्या मागणीवर फडणवीसांची रोखठोक भूमिका

ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढणार?

प्रकाश शेंडगे म्हणाले, सत्तेच्या माध्यमातून त्यांनी आमच्या आरक्षणाचा सत्त्यानाश केला आहे. त्यामुळे ही सत्ता उलथवण्यासाठी आम्हाला ओबीसींचा स्वतंत्र पक्ष निर्माण करावा लागेल. त्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. आम्हाला वाटत होतं की असं काही होणार नाही. आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. परंतु, आता आमचं आरक्षण लुटलं आहे. त्यामुळे आम्हाला ही सत्ता उलथून टाकावी लागेल. आम्ही सर्व ओबीसी नेत्यांची बैठक बोलावून याबाबतचा निर्णय घेणार आहोत. लवकरच आम्ही आमची राजकीय भूमिका स्पष्ट करू.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obc leader prakash shendge angry over maratha government order eknath shinde asc
Show comments