मराठा आंदोलक आणि बांधव सगळे शांतच आहेत. तरीही त्यांच्याविरोधात जाणीवपूर्वक षडयंत्र रचलं जातं आहे असं दिसतं आहे. विनाकारण खोट्या केसेसमध्ये गुंतवलं जातं आहे. या सगळ्याकडे सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे हे कुणी विसरु नये असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला एक माहिती मिळाली आहे

मला एक माहिती मिळाली ती जर खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईन पण मला भेटायला बीडचे काही लोक इथे आले होते. त्यांनी असं सांगितलं की छगन भुजबळ यांच्या पाहुण्यांचं जे काही हॉटेल काय फोडलं ते त्यांच्याच पोरांनी फोडलं आहे. मी आधीही म्हटलं होतं की सत्ताधाऱ्यांचेच लोक आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत हे आता तंतोतंत खरं होताना दिसतं आहे. माझ्याकडे असलेली माहिती ऐकीव आहे पण मी जे बोलतो आहे ते सत्य असेल असं मला वाटतं आहे. मराठ्यांना फोडाफोडी आणि जाळपोळीशी घेणंदेणं नाही. मराठे फक्त स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून उभे आहेत. गोरगरीबांच्या पोरांवर खोट्या केसेस करुन, ओबीसींचे नेते बीडला जाऊन विनाकारण जात संपली पाहिजे, पोरं मोठी नाही झाली पाहिजेत यासाठी ताकदीने प्रयत्न करत आहेत. मला अशीही माहिती मिळाली की ते पोलीस अधीक्षकांजवळही जाऊन बसले होते. त्यांनी काही नावं लिहून दिली असंही समजतं आहे.

निरपराध पोरांना उगाच त्रास दिला जातो आहे

आमची काही काही पोरं अशी आहेत जी कुणाच्याही उद्रेकात किंवा कशातच नाहीत. साखळी उपोषण करणारे, शांततेत आंदोलन करणारे तरुण यांना गोवलं जातं आहे. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही सांगू इच्छितो की हे आमच्याविरोधात षडयंत्र आहे. पुढे कारण आमच्याशीच गाठ आहे. आमच्यावर कितीही खोटे गुन्हे दाखल करा आम्ही मागे हटणार नाही. जे काही षडयंत्र चाललं आहे त्याकडे सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे. मराठ्यांच्या मुलांना जाणीवपूर्वक गुंतवलं जातं आहे. जे खरोखर उद्रेक करत आहेत त्यांना सोडू नका. मात्र सामान्य मराठा तरुणांना अडकवून बदनाम करण्यासाठी ओबीसींचे काही नेते प्रयत्न करत आहेत.

हे पण वाचा- ‘उपोषण संपल्यावर देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता का?’ जरांगे पाटील म्हणाले….

माझं सरकारला आवाहन आहे

निष्पाप आंदोलकांना अडकवण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे असं माझं सरकारला आणि सर्वपक्षीय मराठा नेत्यांना आवाहन आहे. ओबीसी नेते आमच्याविरोधात षडयंत्र करत आहेत. मात्र आम्ही षडयंत्रांना घाबरत नाही. जे काही चाललं आहे विनाकारण चाललं आहे. जर सरकार आणि सर्वपक्षीय नेत्यांनी हे थांबवलं नाही तर आम्ही पुढे काय करायचं त्यासाठी समर्थ आहोत असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

आम्हीही मागे हटणार नाही. आम्हीही ५४ टक्के आहोत हे कुणीही विसरु नये. बीडमधल्या पोलिसांवर दबाव आणला जातो आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांना गुंतवणं सुरु आहे. आम्ही खोट्या गुन्ह्यांना घाबरत नाही तसंच केसेसना भीत नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obc leaders are conspiring against us if the government does not control them we will not remain silent said manoj jarange patil scj
Show comments