“राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपा सध्या करत असलेलं आंदोलन ही नौटंकी आहे”, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. “केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आलं आहे. त्यामुळे, आंदोलनाची नौटंकी करून त्यांना आपलं हे पाप झाकता येणार नाही. हिंमत असेल तर भाजपाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करावं”, असं आव्हान देखील यावेळी नाना पटोले यांनी दिलं आहे.

“केंद्र सरकारकडे जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी असताना देखील ते ही माहिती राज्य सरकारांना देत नाहीत. सुप्रीम कोर्टानेही ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीदरम्यान ओबीसींचा इम्पीरिकल डेटा मागितला होता. परंतु, केंद्राने तो जाणीवपूर्वक दिला नाही. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली पण केंद्राने तो दिला नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे”, असं म्हणत नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षण प्रश्नी भाजपाने केलेल्या आंदोलनावर देखील टीका केली आहे.

भाजपाला ओबीसींना सत्तेपासून वंचित ठेवायचंय!

नाना पटोले यांनी याबाबत बोलताना पुढे देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. “या परिस्थितीला मोदी सरकार जेवढं जबाबदार आहे तेवढंच फडणवीस सरकार देखील जबाबदार आहे. २०१७ साली फडणवीस यांनी एक परिपत्रक काढून नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे ढकलली. त्यानंतर इतर जिल्हा परिषदाही कोर्टात गेल्या. यातूनच गुंता वाढत गेला आणि परिणामी ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशा-यावर चालणा-या भाजपाची विचारधाराच आरक्षणविरोधी आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण घालवून त्यांना ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवायचं आहे”, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

फडणवीसांनी झोपा काढल्या आणि आता…!

“भाजपा त्यांच्या पापचं खापर राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर फोडत आहे. त्यासाठी, आंदोलनाचा कांगावा करत आहे. मात्र, भाजपाचं हे ढोंग जनतेला विशेषतः बहुजन समाजाच्या लक्षात आलं आहे. भाजपाच्याच बेजबाबदारपणामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण संकटात आलं असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील जवळपास ५५ ते ५६ हजार जागांवर पाणी सोडावं लागणार आहे. पाच वर्ष सत्तेत असताना फडणवीसांनी झोपा काढल्या आणि आता आंदोलन करून ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात आहे”, अशा कठोर शब्दांत नाना पटोले यांनी भाजपा आणि फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Story img Loader