विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळवून देण्यासंदर्भात राजकीय संन्यासाचं विधान केलं होतं. नागूपर येथे झालेल्या चक्का जाम आंदोलनादरम्यान ‘सत्तेची सूत्रे हाती द्या, तीन महिन्यात ओबीसी आरक्षण देतो नाहीतर राजकीय संन्यास घेईन,’ असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांच्या या विधानावरून शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य केलं होतं. “मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न असे सगळे कठीण प्रश्न सोडविण्याची चावी फक्त फडणवीस यांच्याकडेच आहे. फडणवीस हे चतुर व चाणाक्ष नेते आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलं होतं. शिवसेनेच्या या भूमिकेनंतर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना पत्र लिहिलं आहे.

चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना लिहिलेलं पत्र…

संजय राऊत जी ,
कार्यकारी संपादक
दैनिक सामना

महोदय,

शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल मी आपले जाहीर आभार मानते. “मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न असे सगळे कठीण प्रश्न सोडविण्याची चावी फक्त फडणवीस यांच्याकडेच आहे. फडणवीस हे चतुर व चाणाक्ष नेते आहेत.”असा उल्लेख या अग्रलेखात करण्यात आला आहे. उशिरा का होईना पण फडणवीस यांच्यातील नेतृत्वगुणांबाबत आपल्याला उपरती झाली, हेही नसे थोडके.

हेही वाचा- “फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही; त्याचं काय झालं?”

सर्व प्रश्न सोडविण्याची चावी फडणवीस यांच्याकडेच आहे, याचे भान शिवसेनेला २०१९ मध्येच झाले असते, तर फडणवीसच पुन्हा युतीचे मुख्यमंत्री झाले असते आणि आज महाराष्ट्राच्या इज्जतीची जी लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत, ती टांगली गेली नसती. मात्र त्यावेळी फडणवीस यांना मुख्यमंत्री करून युतीचे सरकार पुन्हा आणण्याऐवजी आपण पाठीत खंजीर खुपसला, हे राज्यातील जनतेने पाहिले आहे. आपल्या त्या एका कर्तृत्ववान नेत्याला मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्याचा आनंद आपल्याला मिळाला असेलच, पण काँग्रेस व राष्ट्रवादीला कायम दूर ठेवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना काय वाटेल? याचा क्षणभरही विचार केला असता, तर महाआघाडीचा प्रयोग आपण केला नसता.

हेही वाचा- संजय राऊतांनी फडणवीस, राष्ट्रवादीची काळजी करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी; दरेकरांचा पलटवार

एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांचे पंख भाजपाने कापल्याचा जावईशोध आपण लावला आहे. खडसे यांना जर खरेच त्यांचे पंख कापल्या गेल्याचे वाटत होते आणि त्यामुळेच त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडला व राष्ट्रवादीच्या तंबूत ते दाखल झाले. तर तेथे त्यांची पद न देता बोळवण केलेली दिसत आहे. खडसेंच्या सन्मानाची आपल्याला इतकीच चिंता असेल तर सिल्व्हर ओकवर आपले वजन वापरून खडसे यांचे चांगले पुनर्वसन आपण करावे, अशी आपणास विनंती आहे. शिवसेनेत निष्ठावंतांचे हाल झाल्याची उदाहरणे आपल्या अवतीभोवती आहेतच. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज उभी करुन ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला टिकवायचं होतं, तेव्हा सोनिया सेनेचे मंत्री रस्त्यावर उतरुन मोर्चे काढत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले, ही बाब लपून राहिलेली नाही. सरकारने सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ घेत जो काही घोळ घातला,त्याचे परिणाम आज ओबीसी समाज भोगत आहे.

आमच्या हाती सत्तासूत्रे द्या, तीन महिन्यात ओबीसी आरक्षण देतो हा फडणवीस यांनी व्यक्त केलेला ठाम विश्वास ओबीसींच्या प्रश्नांबाबत त्यांना असलेल्या सखोल ज्ञानातून आणि ओबीसींप्रति त्यांच्या मनात असलेल्या कळवळ्यातून आलेला आहे. ओबीसी बांधवांमध्ये राहूनच त्यांनी आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला आणि ओबीसी समाजाने साथ दिल्यानेच इथवर आलो ,अशी कृतज्ञता फडणवीस यांनी जाहीरपणे अनेकदा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीच्या दगडाखाली वाघाचं शेपुट दबलंय.. म्हणून त्यांना बहुजन समाजाला न्याय देण्याचं सोडा तर शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचं नामकरण ‘संभाजीनगर’ करता आलं नाही, उलट आपलं हिंदुत्व कॅांग्रेसच्या खुंटीला टांगून तुम्ही राममंदिराच्या निर्माणात उणीवा शोधतायेत.

Story img Loader