मराठा आरक्षणा पाठोपाठ ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यात ऐरणीवर आला आहे. भाजपाकडून राज्य सरकारकडे बोट दाखवलं जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाने राज्यभर चक्का जाम आंदोलनही केलं आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारमधील मंत्री केंद्र सरकारला जबाबदार धरत आहेत. केंद्र सरकारकडून डेटा दिला जात नसल्याचा सरकारमधील काँग्रेसकडून केला जात असून, भाजपाने काँग्रेस नेत्यांना दोन भाषणं ऐकण्याचा सल्ला दिला आहे. या भाषणांच्या लिंकही भाजपाने दिल्या असून, “अजूनही विषय समजला नसेल तर या दोन लिंक ऐका. त्याने २ फायदे होतील, एक म्हणजे डोक्यात प्रकाश पडेल आणि दुसरा म्हणजे आरक्षणाचा प्रश्न सोडविणे सोपे होईल,” असा सल्ला भाजपाने दिला आहे.

राज्यात ओबीसी आरक्षणावरून प्रचंड राजकीय घमासान सुरू आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा शांत होत असताना ओबीसी आरक्षणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाकडून आंदोलन करण्यात आलं, तर सरकारमधील मंत्र्यांनी सर्व पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांना ट्विट करून उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले केशव उपाध्ये?

“काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू आहेत. विजय वडेट्टीवार हे केंद्राकडे बोट दाखवतात, तर सचिन सावंत हे काही पत्राकडे बोट दाखवतात… अहो, पण एसईसीसीचा डेटा हा ५० टक्क्यांच्या आतल्या आरक्षणासाठी नाही, तर वरचे आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी ती माहिती मागण्यात आली,” असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

“पण, २०१३ मध्ये त्यावेळच्या डॉ. मनमोहनसिंग सरकारने एक आदेश काढला होता की, ही माहिती राज्यांना देऊ नका. कारण, हा संपूर्ण डेटा चुकीचा आहे. तो राज्यांना दिला तर अनेक गंभीर आणि नवीन प्रश्न निर्माण होतील. आणि अजूनही विषय समजला नसेल तर या दोन लिंक ऐका. त्याने २ फायदे होतील. १. डोक्यात प्रकाश पडेल २. आरक्षणाचा प्रश्न सोडविणे सोपे होईल,” असा सल्ला देत भाजपाने काँग्रेस नेत्यांना सुनावलं आहे.

पंकजा मुंडे म्हणतात…

“इम्पेरिकल डेटा हा राज्य सरकारचा विषय आहे. इम्पेरिकल डेटासाठी आम्हीही पत्रव्यवहार केला होता. ओबीसी समाजाला अंधकारातून बाहेर काढण्यासाठी सर्व एकत्र आलोय. नाना पटोलेही आम्हाला आमचे मानायला हरकत नाही,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज (२७ जून) नागपुरात ओबीसी चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.

Story img Loader