सरकार कुणबी प्रमाणपत्र देत असेल, तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार का? मराठा आरक्षणाला आरक्षण देत असाल, तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा. टक्का वाढवून देत नसाल, तर आम्ही मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
आंदोलनाची मूळ मागणी कुणबी जात प्रमाणपत्राची आहे. ओबीसींचं आरक्षण न वाढवता प्रमाणपत्र देण्यास सुरूवात झाल्यास काय करणार? असा प्रश्न विचारल्यावर वडेट्टीवार म्हणाले, “माझ्या जिवात जीव असेपर्यंत ओबीसींच्या मूळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. जनतेत गैरसमज नको. मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम करू नये. एकीकडं सरकार वेगळी तर बावनकुळे वेगळी भूमिका घेतात. लोकांना फसवण्याचं काम सुरू आहे.”
हेही वाचा : जालना मराठा आंदोलकांवरील लाठीहल्लाप्रकरणी फडणवीसांची माफी, रोहित पवार लक्ष्य करत म्हणाले…
“ओबीसींमध्ये ५२ टक्के लोक येतात. तर, २७ टक्के ओबीसी आरक्षण आहे. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवून खूशाल घ्यावं. ‘सरकार आरक्षण वाढवून देत असेल, तर माझी अडचण नाही,’ असं भुजबळांनी म्हटलं. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचं नुकसान होऊ नये. म्हणून मराठा समाजाला मी समर्थन दिलं आहे,” असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : “…अन्यथा सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही”, जालन्यातून बच्चू कडूंचा इशारा
“जिल्हा अधिक्षक म्हणजे सरकार आहे. अधिकारी आदेश देतो, तेव्हा जबाबदारी सरकारची असते. लाठीहल्ल्या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या मनानं माफी मागितली. पण, याचा मराठा समाजाला कितपत आनंद झालाय, ते कळवतील. मात्र, जालन्यातील लाठीहल्ला हा सरकार पुरस्कृत होता, हे सिद्ध झालं आहे,” असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.