दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर वंजारी समाजाच्या विवाह समारंभात सुरुवातीला श्रद्धांजली व नंतर मंगलाष्टका घेतल्या जात आहेत. विवाह समारंभही अत्यंत साध्या पद्धतीने व वाजंत्री, तोफा न वाजवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या साहेबांची छबी आता दिसणार नसल्याने अनेक घरांमध्ये दूरदर्शन संचही बंदच राहिले आहेत. लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंतच्या मनात एकच प्रश्न आहे, साहेबांचे असे अचानक निधन कसे झाले?
बीडसह राज्यातील अनेक जिल्हय़ांत असलेला वंजारी समाज अशिक्षित व ऊसतोडणी मजूर म्हणून ओळखला जातो. संत भगवानबाबा यांनी या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाजाला अध्यात्मातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, संत भगवानबाबा यांच्यानंतर मागील ४० वर्षांत मुंडे यांनी या समाजाला सामाजिक व राजकीय चेहरा दिला. अनेकांना सत्तेत जाण्याची संधी मिळाल्याने हा समाज राजकीयदृष्टय़ा जागृत झाला. मुंडे एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, ही आशा होती. त्यामुळे सत्तेत नसले, तरी मुंडेंनी जागृत केलेल्या स्वाभिमानामुळे संत भगवानबाबा यांच्यानंतर मुंडे यांच्यावर अपार श्रद्धा होती. त्यामुळे मुंडे यांच्या अपघाती निधनाने समाजाचा चेहराच हरपला गेल्याची भावना निर्माण झाली.
बहुतांशी विवाह समारंभाच्या लग्नपत्रिकांवर मुंडेंची छबी कायम असते. त्यामुळे मागील ८ दिवसांत निश्चित झालेल्या लग्नसमारंभावर दुखाचे सावट पसरले. कोणतेही वाद्य, वाजंत्री, स्वागत न करता अत्यंत साध्या पद्धतीने विवाह लावण्यात येत आहेत. विवाह समारंभाच्या ठिकाणी मुंडे यांच्या वेगवेगळया रुपातील फोटो सर्वाचे लक्ष वेधून घेतात. मंगलाष्टकाच्या पूर्वीच मुंडेंना श्रद्धांजली वाहून अवघ्या पाच मंगलाष्टकांत समारंभ उरकला जातो. रविवारी सायंकाळी नगर रस्त्यावरील समर्थ मंगल कार्यालयात राजाभाऊ मुंडे यांच्या मुलीचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. दुसरीकडे मुंडेंच्या निधनानंतर साहेबांची छबी आता दिसणार नसल्याने अनेकांच्या घरचे दूरदर्शन संच बंद झाले आहेत.
मंगलाष्टकापूर्वी श्रध्दांजली, विवाह समारंभ साध्या पद्धतीने
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर वंजारी समाजाच्या विवाह समारंभात सुरुवातीला श्रद्धांजली व नंतर मंगलाष्टका घेतल्या जात आहेत. विवाह समारंभही अत्यंत साध्या पद्धतीने व वाजंत्री, तोफा न वाजवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
First published on: 10-06-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obit before mangalashtak simple marriage programme