दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ात बिडकीन भागातील ७०० एकर जमिनीचा मावेजा देण्यासाठी महसूल विभागाला द्राविडी प्राणायाम करावा लागणार आहे. या भागातील साडेतीनशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या जमिनी महसूल दप्तरी क्र. २ म्हणून गृहीत धरल्या जातात. या जमिनी इनामी असल्याने त्याचा मावेजा देताना या जमिनी त्या शेतक ऱ्याच्या नावावर आहेत का? नसतील तर या जमिनीच्या विरासती मंजूर आहेत का, हे तपासावे लागणार आहे. येणारी अडचण लक्षात घेऊन या भागातील शेतक ऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. त्यांनी या अनुषंगाने अर्ज करा, सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले.
बिडकीन, बनीतांडा, बांगलातांडा, निलजगाव, नांदलगाव भागातील २ हजार ३५१ हेक्टर भूसंपादन होणार आहे. त्यातील शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात रक्कमही दिली जात आहे. सोमवारी १५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. आणखी काही रक्कम लवकरच दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या भागातील काही जमिनी इनामी देण्यात आल्या. काही जमिनींची नोंद क्र. २ अशी आहे. या जमिनी विकताना सरकारची परवानगी घ्यावी लागते. जमीन खरेदी-विक्रीनंतर काही हिस्साही सरकारदरबारी जमा करावा लागतो. ज्या व्यक्तीच्या नावे इनाम आहे, त्यांच्या वारसांची नावे लावण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. अशी अनेक प्रकरणे प्रलंबित असतात. ७०० एकरांहून अधिक जमीनमालकांनी या जमिनीचा मावेजा मिळावा, असा अर्ज नव्याने करावा लागणार आहे.
इनामी जमिनी असल्याने त्याचा मावेजा मिळविण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागेल. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न सकारात्मक पद्धतीने सोडविला जाईल, असे सांगितले. मात्र, त्यासाठी त्यांना अर्ज करावे लागतील. त्या अर्जावर विचार करून मावेजा दिला जाणार आहे. बिडकीन भागात मोठय़ा प्रमाणात भूसंपादनाची रक्कम मिळत असल्याने बँकांच्या शाखांमध्ये मोठी वाढ झाली. बिडकीनमध्ये पूर्वी बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा होती. आता स्टेट बँक ऑफ हैदराबाद, आयसीआयसीआय, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने स्वतंत्र शाखा उघडल्या आहेत. काही खासगी व सहकारी बँकांनीही शाखा उघडल्याची माहिती शिखर बँकेचे अधिकारी घाटे यांनी दिली.