मागच्या दोन दिवसांत पुन्हा थंडी वाढली असतानाच सोमवारी नगर शहर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कर्जत तालुक्यालाही आठवडय़ात तिसऱ्यांदा गारपिटीचा तडाखा दिला. सततच्या गारपिटीने तालुक्यातील शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे.
शहर व परिसरात मागच्या दोन-तीन दिवसांत पुन्हा थंडीची लाट आली. रात्रीच्या वेळी गारठून टाकणारी थंडी व दिवसा वेगाने वाहणारे वारे यामुळे नगरकर त्रस्त झाले असतानाच मंगळवारी दुपारी भरउन्हात शहर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही वेळ टपोरे थेंब पडत होते. या अनपेक्षित पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. काही वेळाची विश्रांती घेऊन सायंकाळी उशिरा पुन्हा शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली. या वेळी जोरदार मेघगर्जनाही सुरू होत्या.
वार्ताहर, कर्जत
कर्जत तालुक्यात आज सोमवारी रात्री पुन्हा एकदा गारपीट झाली. आज पडलेल्या पावसाने तालुक्यातील कमी नुकसान झालेला भाग हे लक्ष्य केले होते. सायंकाळी ८ वाजता तालुक्यातील राशिन, खेड, चिलवडी, बेनवडी, थेरवडी, कर्जत, कुळधरण, सुपेकरवाडी, धालवडी, पिंपळवाडी, दुरगाव, वडगाव तनपुरे या परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. कुळधरण परिसरात पुन्हा गारपीट झाली. विविध पिके व फळबागांसह या पावसाने राशिन ते कर्जत परिसरातील वीटभट्टय़ांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Story img Loader