अवकाळी पावसाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास इचलकरंजीसह परिसराला चांगलेच झोडपून काढले. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने व घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. झाडे पडल्याने तीन चारचाकी व दोन दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. तर जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते.
गत दोन दिवसांपासून शहरात मोठय़ा प्रमाणात उकाडा वाढला होता. काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर बरसलेल्या पावसामुळे नागरिकांना थोडासा गारवा लाभला. मात्र या वळिवाच्या पावसाने नुकसानीलाही सामोरे जावे लागले. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे शहरातील बंडगरमाळ, पंचवटी चित्रमंदिर, संग्राम चौक, विकली मार्केट, लायन्स ब्लड बँकनजीक आदींसह विविध भागात झाडे व फांद्या तुटून पडल्या. नारायण पेठ परिसरात मोठा वृक्ष उन्मळून पडल्याने त्या खाली सापडून दोन चारचाकी व दोन दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे अण्णा रामगोंडा शाळा परिसरात एका टेम्पोवर तसेच दुचाकीवर झाड पडल्याने नुकसान झाले. झाडे पडलेल्या भागात बराच काळ वाहतूक खोळंबली होती. तर शिवाजीनगर पोलिस ठाणे परिसरातील केटकाळे गल्लीत सूर्यकांत वासुदेव यांच्या घरावरील सर्वच पत्रे वाऱ्यामुळे उडून गेल्याने त्यांचा संसार उघडय़ावर पडला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे किरकोळ विक्रेत्यांची चांगलीत्र त्रेधातिरपिट उडाली.
अनेक ठिकाणी झाडांसह विद्युत खांब कोसळून तारा तुटल्याने अनेक भागात विजपुरवठा खंडित झाला होता. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक सखल भागात पाणी साचले होते. तर सर्वच भागातील रस्त्यांची मोठय़ा प्रमाणात खुदाई करण्यात आल्याने पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती.
अवकाळी पावसाने इचलकरंजीला झोडपले
अवकाळी पावसाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास इचलकरंजीसह परिसराला चांगलेच झोडपून काढले. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने व घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले.
First published on: 08-05-2014 at 02:50 IST
TOPICSअवकाळी पाऊस
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odd time rain in ichalkarnaji