बुधवारी रात्री जत तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वेळी वीज पडून यळदरी (ता. जत) येथील सलिम हैदर मदारी (वय ३२) याचा मृत्यू झाला. तसेच वादळी वाऱ्याने करजगी येथे पाच घरांचे पत्रे उडून गेले आहेत.
दिवसभराच्या उकाडय़ानंतर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील जत तालुक्यात माडग्याळ, हॉस्पेट, सोन्याळ, संख, करजगी परिसरात जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यळदरी येथे बिळूर रोडवरील खडीक्रशरजवळ आडोशाला थांबलेल्या सलिम मदारी या कामगारावर वीज कोसळली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. करजगी येथे रेवय्या नंदरगी, तातोबा जाधव, भानूदास जाधव, ईरय्या मठपती, मल्लैय्या मठ यांच्या घराचे पत्रे उडाले.
विटा, खानापूर परिसरासह कडेगाव, कडेपूर परिसरात गारांसह पाऊस झाला. खानापूर तालुक्यात जाधववाडी येथे गारांच्या तडाख्यात सापडलेल्या यशवंत ठोंबरे यांच्या ६ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. यशवंत ठोंबरेही गारांमुळे जखमी झाले.