तुळजापूर तालुक्यातील जळकोट, हंगरगा (नळ) परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारांचा पाऊस झाल्याने हंगरगा (नळ) शिवारातील जिलानी कुरेशी यांची आठ एकर क्षेत्रावरील द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे.
गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जळकोट व हंगरगा परिसरात गारांचा पाऊस झाला. या पावसाने द्राक्ष, ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्याला आलेला मोहोर पार गळून गेल्याने आंबा पिकाचेही नुकसान झाले आहे. सध्या शेतकरी रब्बी हंगामातील पिके काढण्याच्या तयारीत असतानाच हा पाऊस झाल्याने पीक भुईसपाट झाले आहे.
सिमनगावची शाळा जमीनदोस्त, जिंतुरात दुपारी गारांचा पाऊस
वार्ताहर, परभणी
रविवारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा अजूनही थांबलेला नाही. बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीनंतर गुरुवारीही जिंतूर-सेलू परिसरात पुन्हा जोरदार गारपीट झाली. दरम्यान बुधवारच्या मध्यरात्री परभणी शहरासह पूर्णा, गंगाखेड परिसरात पावसाने हजेरी लावली. या आठवडय़ात सलग होत असलेल्या अवकाळी पावसाने शेकडो हेक्टरवरील गहू, ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्हाभरासह मराठवाडय़ात अवकाळी पावसाने या आठवडय़ात झोडपले आहे. रविवारी झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे सुरू असतानाच पुन्हा बुधवारी चारच्या सुमारास सेलू, बोरी परिसरात गारपीट झाली. या गारपिटीमुळे गहू आणि ज्वारीचे पीक आडवे झाले. बोरी येथील अनेक घरावरील पत्रेही उडून गेली. वालूर भागात सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, ज्वारीची पीके आडवी झाली. अवघ्या अध्र्या तासातच सगळीकडे पाणीच झाले. अनेक ठिकाणी घरावरची पत्रे उडाली.
बोरी, कौसडी व कुपटा परिसरात तुफान वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामध्ये सिमनगाव येथील जिल्हा परिषद शाळा जमीनदोस्त झाली. वारा सुटण्यापूर्वीच मुख्याध्यापक एस. जी. भुजबळ यांनी सतर्कता दाखवत शिक्षकांसह विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. विद्यार्थी बाहेर पडताच काही वेळातच सोसाटय़ाच्या वाऱ्याने शाळेची पत्रे उडाली आणि िभतीही जमीनदोस्त झाल्या. यामध्ये शाळेतील संगणक, पंखे, कपाट आदी  सामानांचे मोठे नुकसान झाले. शाळा संपूर्ण पडल्यामुळे आता विद्यार्थ्यांची शाळा उघडय़ावरच भरणार आहे. या भागातील पाऊस थांबताच परभणी शहरासह गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यात पावसास सुरूवात झाली. रात्री ११ च्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. पुन्हा दीडच्या सुमारास या भागात अर्धातास पाऊस झाला. या पावसासोबत सोसाटय़ाचा वारा झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मध्यरात्री अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. गुरुवारी दिवसभर वातावरण ढगाळ राहिले. दुपारी चारच्या सुमारास जिंतूर शहरात अचानक सुसाट वारे वाहू लागले आणि काही क्षणातच गारांचा पाऊस झाला. अर्धातास गारांचा मारा झाल्याने शहरातील रस्त्यावरील गारांचा खच पडला होता. गारांचा पाऊस थांबल्यानंतरही पावसाची भुरभूर सुरूच होती. जिंतुर तालुक्यातील बामणी, वझर, वाघी, धानोरा, दगडचोप, ईटोली, चारठाणा या भागातही गारपीट झाली. शहरातील वरुडवेस भागात वाऱ्यामुळे वीज खांबात प्रवाह उतरुन एक बकरी दगावली. सेलूतही याच वेळेस पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. परभणी शहरातही काही वेळ पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे  शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या वेगामुळे अनेक भागातील वीजपुरवठा सलग तिसऱ्या दिवशीही खंडीत झाला होता.
पिकांचे नुकसान; दोन दिवसांत वीज पडून पाच जण ठार
प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी दुसऱ्या दिवशीही पुन्हा गारपीट झाली. विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. बुधवारी रात्रीपासून झालेल्य पावसात मराठवाडय़ात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद, बीड, जालना येथे बुधवारी चौघा जणांचा वीज पडून मृत्यू झाला. तर गुरुवारी दुपारी हिंगोली येथील बाळकृष्ण सुखराम जाधव (वय ५०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. पिकांचे नुकसान एवढे आहे की, शासनाने मदत केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी भावना लोकप्रतिनिधींनीही व्यक्त केली.
औरंगाबाद जिल्ह्य़ात दुपारी चारच्या सुमारास आभाळ भरून आले. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. तालुक्यातील ओवर जटवाडा आणि आसपासच्या तांडय़ाजवळ अक्षरश: गारांचा खच होता. दुपारच्या पावसाने अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले. बहुतेकांनी बैलगाडीच्या खाली आसरा घेतला. झाडाखाली थांबले तर वीज पडेल, अशी भीती होती. शहरातही सुमारे १० मिनिटे पाऊस पडला. मात्र, त्याची तीव्रता बुधवारएवढी नव्हती. या पावसामुळे आंब्याचा मोहर झडून गेला. अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले. हिंगोलीचे वार्ताहर कळवतात की, गुरुवारी पुन्हा जोरदार गारांचा पाऊस झाला. सेनगाव तालुक्यातील भगवती गावात झाडाखाली थांबलेल्या जाधव यांच्या अंगावर वीड पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. परभणी येथे सिमनगाव येथील जि. प.ची शाळा जमीनदोस्त झाल्याचे वृत्त आहे.

Story img Loader