श्रीगोंदे शहरातील सततच्या वीजपुरवठय़ाने त्रस्त झालेले व्यापारी व नागरिकांनी आज श्रीगोंदे बंदची हाक दिली व कडकडीत बंद पाळून महावितरण कंपनीचा निषेध केला आहे.
श्रीगोंदे शहर व तालुक्यामध्ये काही दिवसांपासून सतत वीज गायब असते. शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा काही तांत्रिक कारणामुळे शनिवारी बंद होता, तो दुस-या दिवशी रविवारीही बंद राहिला. एक तर तापमान वाढलेले. असह्य़ उकाडा, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला होता. या शिवाय सर्व व्यापार व दवाखानेदेखील यामुळे बंद पडले होते. कार्यालयात विचारणा केली असता कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत होते. नंतर तर कार्यालयातील फोन बाजूला काढून ठेवण्यात आला होता. यामुळे संतप्त झालेल्या नागरिक व व्यापा-यांनी महावितरणच्या कार्यालयावर रविवारी रात्री मोर्चा काढला. त्या वेळी कार्यालयाच्या परिसरातील कर्मचा-यांच्या वसाहतीमध्ये वीजपुरवठा सुरू होता. त्या वेळी वातावरण चांगलेच तापले. नागरिक रस्त्यावर ठिय्या देऊन बसले होते. वातावरणातील तणाव पाहून तिथे पोलीस आले. त्यांनतर नागरिक घरी गेले. दुस-या दिवशी आ. बबनराव पाचपुते यांनी महावितरणच्या अधिका-यांची बैठक घेऊन त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
दरम्यान, रविवारीच सर्व व्यापारी व नागरिकांनी आज, मंगळवारी शहर महावितरणच्या बेजबाबदार कारभाराला कंटाळून बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज दिवसभर बंद पाळण्यात आला.

Story img Loader