जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लगत असलेल्या सेतू कार्यालयात दलालांचा विळखा पडल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांनी सेतू कार्यालयात अचानकपणे धाड टाकली असता त्यात आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या. यावेळी एका दलालाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे विविध दाखल्यांच्या अर्जाच्या तब्बल १७ पोहोच पावत्या आढळून आल्या. याप्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार दलालासह सेतू चालकांविरूध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोहीद शब्बीर सय्यद (२८,रा. अंबिकानगर, नई जिंदगी चौक, सोलापूर) या दलालासह सेतू चालक मंगेश हंसे व रणजितसिंह ठाकूर यांच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नव्हे तर जिल्हाधिका-यांनी सेतू कार्यालय व्यवस्थापनाचा मक्ताही रद्द केला. आता सेतू कार्यालयाच्या व्यवस्थापनासाठी नव्याने निविदा मागविण्यात आल्या असून यात चार कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत.
सेतू कार्यालयात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विविध दाखले काढण्यासाठी नागरिक व विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत असताना त्याचा विचार करून पूरक सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित होते. परंतु सेतू कार्यालयात दलालांचीच चलती असून तासान् तास रांगेत तिष्ठत उभे राहणा-या सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना मात्र वेठीस धरले जाते. दलालांची दादागिरी वाढली असताना त्यांच्याशी सेतू कार्यालयातील यंत्रणेचेही हितसंबंध गुंतल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी एका तरुणाला दलालाने केलेल्या बेदम मारहाणीच्या पाश्र्वभूमीवर या तक्रारी प्रकर्षांने पुढे आल्या होत्या. अखेर जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी दखल घेऊन ठोस कारवाई केली. त्यामुळे दलालांचे व सेतूचालकांचे धाबे दणाणले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा