सोलापूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात समाज माध्यमावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया नोंदवून त्यांची बादनामी केल्याप्रकरणी बार्शीत एका तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. युवराज चंद्रकांत ढगे (वय ३५) असे त्याचे नाव आहे.
हेही वाचा >> दोन लाखांचे कर्ज दिले, बदल्यात २२ लाखांची वसुली, धुळ्यात अवैध सावकारीविरोधात कारवाई
वटपौर्णिमा सणाच्या दिवशी रूपाली चाकणकर यांनी आपण लग्न झाल्यापासून आतापर्यंत एकदाही वडाच्या झाडाला फेरे मारले नाहीत. नवऱ्यानेही कधी तसा हट्ट केला नाही, असा मजकूर समाजमाध्यमातून प्रसारित केला होता. त्यावर बार्शी येथील युवराज ढगे या तरूणाने चाकणकर यांच्या विरोधात दोन आक्षेपार्ह प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. यात त्यांची बादनामी करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर बार्शी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सुवर्णा शिवपुरे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी युवराज ढगे याच्या विरोधात फिर्याद दिली.
हेही वाचा >> कल्याण : रिक्षावर लागलेल्या स्टिकरमुळे सुरक्षा रक्षकाच्या हत्येचा उलगडा; एक आरोपी अटक, दोघे फरार
दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी युवराज ढगे या तरुणाविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह भारतीय दंड संहितेतील कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे पुढील तपास करीत आहेत.