दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून वीर सावरकर जयंती दिनी अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्याचं प्रकरण ताजं असतानाच आता इंडिक टेल्स वेबसाईटवर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचं प्रकरण छगन भुजबळ यांनी समोर आणलं आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी कारवाई केली जावी आणि या वेबसाईटवर बंदी घातली जावी अशी मागणी केली होती. आज त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची याच प्रकरणात भेट घेतली आणि या प्रकरणात कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
इंडिक टेल्स या वेबसाईटवर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य लिहिण्यात आली आहेत. आमच्यासाठी या दोन्ही व्यक्ती दैवत आहेत. हे आम्ही मुळीच सहन करु शकत नाही. मुलींची पहिली शाळा सुरु झाली ती सावित्रीबाई फुलेंमुळेच. त्यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि घाणेरडं लिखाण केलं जातं आहे इतिहास तोडला जातो आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो आहे. आमची मागणी ही आहे की हे लिखाण करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई केली जावी.
भुजबळ यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र
छगन भुजबळ यांनी याच प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पपत्रात म्हटलं आहे की, “इंडिक टेल्स नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेले आहे. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे.” भुजबळ पुढे म्हणाले की, “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे, यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड, धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.” तरीही त्यांच्याविषयी असे लिखाण केलं जातं आहे. यामुळे कठोर कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी या पत्रात केली होती. आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊनही त्यांनी हीच मागणी केली आहे.