वाई: राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर साताऱ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट होता. कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होती.
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे तीन आणि विधान परिषदेचे दोन आमदार व एक खासदार आहेत. पक्ष फुटीनंतर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण व आमदार मकरंद पाटील यांनी अजित दादांना समर्थन दिले आहे. तर आमदार शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटील आणि शरद पवारांना साथ दिली आहे. पवार सोमवारी ( दि३) रोजी सकाळी कराड येथे येणार आहेत. ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून साताऱ्याला येणार आहेत.
आणखी वाचा-नव्या सत्ता समीकरणामुळे सोलापुरात राष्ट्रवादीसह शिंदे गटात चलबिचलता; मोहिते-पाटील गटही अस्वस्थ ?
राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर साताऱ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस भवन मध्ये शुकशुकाट होता. पक्षाचे सरचिटणीस राजकुमार पाटील कार्यालय मध्ये बसून होते. पक्ष फुटीनंतर आमदार रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सध्याच्या घडामोडींबाबत आमदार मकरंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी जास्त बोलणे टाळले. तुम्ही आता कोणत्या गटाबरोबर आहात असे विचारले असता, मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी याबाबत काहीही बोललो नाही. त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्या शिवाय एकाएकी कोणताही निर्णय घेणे शक्य नाही, असे आमदार मकरंद पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मंत्र्यांच्या शपथविधीची नावे राज्यपालांना कळविताना पहिल्या यादीमध्ये आमदार मकरंद पाटील यांचे नाव कॅबिनेट मंत्री म्हणून सुचवण्यात आले होते मात्र मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांशी व मतदारसंघाचे नेत्यांशी चर्चा केलेली नाही याशिवाय शरद पवारांचा दबाव या बाबी विचारात घेऊन सध्याच्या घडामोडीमध्ये स्वतःला काही वेळ अलिप्त राहणे जास्त महत्त्वाचे असे समजले.