नावात काय आहे? हे शेक्सपिअरचे वाक्य चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. मात्र नाव चुकले तर कशी गंमत होते त्याचा अनुभव औरंगाबादच्या सर्वसाधारण सभेत सगळ्यांनाच आला. सोमवारी औरंगाबादच्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांनी एका नगरसेविकेचे नाव चक्क ‘माधुरी दीक्षित’ असे घेतले. त्यानंतर या नगरसेविकेने लगेच काय बोलताय कळते आहे का? असा प्रश्न नगरसेविकेने विचारला. ज्यानंतर अधिकारी काहीसे गोंधळून गेले. मात्र नाव असे पुकारले गेल्याने सभागृहात हशा पिकला. पाणी प्रश्न असल्याने महिला नगरसेविकाही आक्रमक झाल्या होत्या.
सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अधिकारी चहल उभे राहिले. पाण्याच्या प्रश्नाबाबत नगरसेवक आणि नगरसेविका सजग आहेत. दोन दिवसांपूर्वीच माधुरी दीक्षित यांचाही फोन आला होता. असे चहल अनावधानाने बोलून गेले. ज्यानंतर भाजप नगरसेविका माधुरी आदवंत उभ्या राहिल्या आणि काय बोलता आहात ते समजते का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नानंतर चहल यांना त्यांची चूक लक्षात आली. चूक अनावधानाने झाल्याने विषय तिथेच संपला आणि कामकाज सुरू राहिले. मात्र माधुरी आदवंत यांचा उल्लेख ‘माधुरी दीक्षित’ असा झाल्याने सभागृहात हशा पिकला