दिल्लीतील करोल बागमधील हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत अक्कलकोट येथे राहणाऱ्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. राहुल एस. शाखापुरे असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते गेल्या दहा वर्षांपासून नवी दिल्ली येथे केंद्रीय औषध मानक गुणवत्ता नियंत्रण संचालनालयात कार्यरत होते. त्यांच्या निधनाने अक्कलकोटमध्ये शोककळा पसरली आहे.
करोल बागमधील अर्पित पॅलेस या चार मजली हॉटेलला मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत १७ जण ठार झाले तर अन्य ३५ जण जखमी झाले होते. जीव वाचविण्यासाठी इमारतीमधून उडय़ा मारणारा एक लहान मुलगा आणि अन्य दोघांचा मृतांमध्ये समावेश आहे. ’शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत अक्कलकोटच्या राहुल एस. शाखापुरे यांचा मृत्यू झाला.
शाखापुरे हे केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या औषध मानक गुणवत्ता नियंत्रण विभागात अधिकारीपदावर कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूची माहिती केंद्रीय औषध मानक गुणवत्ता नियंत्रण संचालनालयाचे महासंचालक डॉ. ई. ईश्वरा रेड्डी यांनी अक्कलकोट येथे त्यांच्या नातेवाइकांना कळविली.
शाखापुरे हे गेली दहा वर्षांपासून दिल्लीत होते. सोमवारी शाखापुरे हे करोल बागेतील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये थांबले होते. त्या वेळी अचानक हॉटेलला भीषण आग लागली. त्यात शाखापुरे यांचाही बळी गेला.
शाखापुरे हे सकारात्मक दृष्टिकोन बाळगून केंद्राच्या शासकीय सेवेत काम करीत होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांशी मिळून मिसळून वागणारे शाखापुरे यांचा स्वभाव नेहमीच सहकारी वृत्तीचा होता, अशी भावना त्यांच्या मित्रांनी व्यक्त केली.