* शंभर कोटींचे सागवान सीमापार * पोलिसांकडूनही सहकार्य नाही
एकीकडे नक्षलवादी, दुसरीकडे लाकूड तस्कर आणि तिसरीकडे सहकार्य न करणारे पोलीस अशा परिस्थितीत राज्याच्या सीमावर्ती भागात कार्यरत असलेल्या वनखात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अवस्था चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी झाली असून मार खाण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. आजवर कोटय़वधीची लाकूड तस्करी उघडकीस येऊनसुद्धा खात्यातील वरिष्ठ अधिकारी या प्रश्नाकडे गांभीर्याने बघायला तयार नसल्याने दुर्गम भागात काम करणारे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
गेल्या बुधवारी रात्री सिरोंचाच्या जंगलात सागवान तस्करांनी केलेल्या मारहाणीत दोन अधिकाऱ्यांसह आठ वनकर्मचारी गंभीर जखमी झाले. या भागात गेल्या अनेक वर्षांपासून तस्करांकडून अधिकाऱ्यांना डांबून ठेवणे, त्यांचे अपहरण करणे, मारहाण करणे अशा अनेक घटना सातत्याने घडत आहेत. भारतीय वनसेवेतील अधिकारीसुद्धा या मारहाणीतून सुटलेले नाहीत. संपूर्ण जगभरात सर्वाधिक किंमत असलेले सागवानाचे लाकूड या जंगलात आहे. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर आहे. सिरोंचा वनविभागातील जंगल ८०० चौरस किलोमीटर क्षेत्रात आहे. १७५ कक्षांत विभागण्यात आलेल्या या जंगलाच्या रक्षणासाठी केवळ २२० कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर पहिल्या वर्षी ६३ तर दुसऱ्या वर्षी ७४ अधिकारी व कर्मचारी आजवर तस्करांच्या मारहाणीत जखमी झाले. गस्तीसाठी जंगलात गेलेल्या पथकांवर दगडफेक झाली नाही, असा एकही दिवस या सीमावर्ती भागात उगवत नाही. अनेकदा जीव वाचवण्यासाठी कर्मचारी पळून येतात. धाडस दाखवले की मार खातात. तस्करांना रोखण्यासाठी वनखात्याने कर्मचाऱ्यांना बंदुका दिल्या आहेत. हा संपूर्ण भाग नक्षलवाद्यांच्या प्रभावात असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना शस्त्रे घेऊन फिरतासुद्धा येत नाही. ‘शस्त्राशिवाय तस्करी रोखा’ असे नक्षलवाद्यांचे सक्त आदेशच आहेत. तस्करी रोखण्यासाठी पोलिसांसोबत संयुक्त गस्त करा, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, या भागात तेही करता येत नाही. पोलिसांसोबत फिरले तर तुम्हीही मराल, असे नक्षलवाद्यांनी वन कर्मचाऱ्यांना बचावून ठेवले आहे. त्यामुळे बहुतांश वेळा या कर्मचाऱ्यांकडील शस्त्रे पोलीस ठाण्यात ठेवलेली असतात. गेल्या चार वर्षांत कर्मचाऱ्यांच्या गोळीबारात ३ तस्कर ठार झाले. या तिन्ही प्रकरणांत मानवाधिकार आयोगाची दखल या कर्मचाऱ्यांना अडचणीत आणणारी ठरली आहे. तस्करीकडे दुर्लक्ष केले तर वरिष्ठ अधिकारी कारवाई करतात. गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक टीएसके रेड्डी यांनी गेल्या वर्षभरात सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मात्र, याच रेड्डींनी आजवर तस्करी रोखण्यासाठी मार खाणाऱ्या एकाही अधिकारी व कर्मचाऱ्याला बक्षीस देऊन गौरवले नाही. अशा स्थितीत नेमके करायचे काय असा प्रश्न या भागातील कर्मचारी आता करू लागले आहेत. तस्करी रोखण्यासाठी वनखात्याने १६ तळ उभारले आहेत. ही संख्या ६३ हवी असा प्रस्ताव दोन वर्षांपासून धूळ खात पडला आहे. केवळ तस्करी नियंत्रणासाठी २०० स्वतंत्र कर्मचारी हवेत अशी मागणीसुद्धा मंत्रालयात पडून आहे. आजवर या जंगलातून तस्करांनी १०० कोटींचे सागवान चोरले आहे.
बुधवारच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी संरक्षण विभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक देवेंद्रकुमार येऊन गेले. मात्र, गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक टीएसके रेड्डी यांना अजून वेळ मिळालेला नाही. जखमींना नागपूरला हलवण्यासाठीसुद्धा त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. आज लोकसत्ताने रेड्डी यांच्याशी अनेकदा संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.