राज्य शिक्षण आयुक्तालयाचा महत्वाकांक्षी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षण आयुक्तालयाने राज्यातील ३६ जिल्हय़ांतर्गत कार्यरत शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्येकी २०० शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. प्रगत शाळा निश्चितीसाठी २५ निकष मिळून १०० गुण असून शंभर टक्के गुण मिळालेली शाळा व प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांस व्दितीय संकलित चाचणीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळालेली शाळा प्रगत शाळा म्हणून गणली जाणार आहे.
राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम अतिशय प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील ३६ जिल्हय़ांत या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात असून जिल्हय़ांकडून प्रतिमाह सादर होणाऱ्या क्रिया अहवालानुसार फेब्रुवारी २०१६च्या नोंदीनुसार राज्यात ८ हजार २५१ शाळा प्रगत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रगत शाळा ही गावाच्या आणि शिक्षकांच्या आत्मसन्मानाचा केंद्रबिंदू ठरली आहे. राज्यातील सर्व शिक्षकांमध्ये कमालीचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला असून शिक्षक स्वयंप्रेरणेने काम करीत आहेत. मुले वाचू लागली, लिहू लागली आणि बोलू लागली आहेत. त्यांच्या वागण्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास जाणवू लागला आहे. त्यामुळे राज्यात शैक्षणिक नवचैतन्याची लाट पसरली आहे. ही शैक्षणिक प्रगती लक्षात घेता वष्रे २०१६-१७ साठी शिक्षण आयुक्तालयाने राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्येकी २०० शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट आखून दिले आहे. त्यानुसार प्रगत शाळा निश्चितीचे २५ निकष ठरविण्यात आलेले आहे. तर पाच गुण बोनस म्हणून देण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक इयत्तेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला घडय़ाळातील काटे फिरवून अचूक वेळ सांगता आली पाहिजे, कोणत्याही वर्गातील कोणत्याही बालकास वर्गानुकूल तीन सोपे शब्द देऊन चार ओळीची कविता तयार करता आली पाहिजे. कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यांला त्या वर्गातील आशयानुसार सामान्य मानावर आधारित इंग्रजीत विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे देता यावी, कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यांला वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता यावे, कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्याार्थ्यांस उभे राहून वर्गानुकूल दिलेल्या विषयावर ४ ते ५ वाक्यात आपले विचार मांडता आले पाहिजे. सर्व २५ निकषांच्या आधारावर ८० गुण मिळाल्यास तसेच संकलित दोनच्या चाचणीत प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांला किमान ४० टक्के गुण प्राप्त झाले असल्यास ही शाळा २०१५-१६ करिता प्रगत म्हणून घोषित करण्यात आली. ज्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी त्यांची शाळा प्रगत झाली आहे असे वाटते, त्यांनी लिंकवर माहिती भरायची आहे. या माहितीची पडताळणी व केलेल्या कामाबद्दल विचारविनिमय व विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी आंतरजिल्हा प्रगत शाळांमधील शिक्षकांच्या भेटीचे नियोजन विद्या परिषद स्तरावरून करण्यात येईल. या शिक्षकांच्या गटास प्रगत शाळा सुसंवाद गट असे संबोधण्यात येईल. ही भेट ही शिक्षकांना स्वशिक्षणासाठी महत्त्वाची ठरणार आहे. यामधून त्यांचे प्रशिक्षण होणार आहे.
शाळांना भेटी देणारे शिक्षक हे शेजारच्या जिल्हय़ातील प्रगत शाळांमधील असल्याने ते ज्या शाळेला भेट देणार आहेत, त्या शाळेने प्रगत होण्यासाठी ज्या प्रक्रियेचा अवलंब केला त्याची माहिती त्यांना होईल. या शाळाभेटीमुळे दोन्ही शाळातील शिक्षक अधिकाधिक समृध्द होतील. या भेटीसाठी आंतरजिल्हा नियोजन विद्या परिषद स्तरावरून करण्यात येईल. सदरची भेट प्रशिक्षणाशी संबंधित असल्याने यासाठी येणारा खर्च सर्व शिक्षा अभियानांतर्गत गटस्तरावरील शिक्षक प्रशिक्षण या लेखाशीर्षांखाली प्रशिक्षणासाठी मंजूर असलेल्या तरतुदीमधून भागविण्यात येणार आहे.
या संदर्भात राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेकडून मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे प्रगत शाळांना भेटी दिल्यानंतर त्याचा अहवाल त्याच दिवशी विद्या परिषदेला सादर करायचा आहे. या अहवालातील माहितीनुसार विद्या परिषद या शाळांना प्रगत शाळा घोषित करणार आहे.
राज्य शासनाने प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्येक जिल्हय़ातील २०० शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी युध्द पातळीवर कामाला लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा