सरकारी यंत्रणेच्या दुरुपयोगाचा विरोधकांचा आरोप; फलनिष्पत्तीबाबत प्रश्नचिन्ह

दारूमुक्तीकडून रोगमुक्तीकडे नेण्यासाठी तथा शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी व  रोजगार देण्यासाठी रामदेवबाबांचा दौरा आयोजित केल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून या दौऱ्याचे प्रयोजन होते हे आता लपून राहिले नाही. तसेच योग शिबिरापासून तर महिला व शेतकरी मेळाव्यात रामदेवबाबांनी पतंजलीच्या सर्व उत्पादनांची जाहिरात केल्याने त्याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होणार की पतंजलीला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे.

अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय व पतंजली योग समितीच्या वतीने दौऱ्याचे नियोजन होते. या दौऱ्याच्या एक दिवस आधी पतंजली योगपीठाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयदीप आर्य यांनी रामदेवबाबा दारूमुक्तीकडून रोगमुक्तीकडे या विषयावर मार्गदर्शन करणार असून पूर्व विदर्भात वनौषधी किंवा अन्य उद्योग सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात या विषयावर रामदेवबाबा एकही दिवस बोलले नाहीत. शेवटच्या दिवशी त्यांनी मूल येथे पतंजली चिकित्सालय सुरू करण्याची घोषणा केली. मूल, चंद्रपूर, वरोरा या तीन प्रमुख विधानसभा मतदार संघातील त्यांचे कार्यक्रम बघता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करूनच हा दौरा व त्यानिमित्ताने महिला महासंमेलन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन होते हे आता लपून राहिले नाही. या मेळावा व महिला संमेलनासाठी शासकीय यंत्रणेचा पुरेपूर वापर सत्ताधाऱ्यांनी करून घेतला. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमात लोकांना गोळा करण्यासाठी भाजपची एक भली मोठी फौज कार्यरत होती. रामदेवबाबा शेतकऱ्यांना फायद्याचा ठरेल असा वनौषधी प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने येथे आले आहेत असा प्रचार भाजपकडून करण्यात आला. प्रत्यक्षात त्यांनी शेतकऱ्यांना केवळ सल्ला देण्याचे काम केले. विदर्भातील शेतकरी कित्येक वर्षांपासून कापूस, सोयाबिन, धान, हरभरा, ज्वारी ही पिके घेतात. मात्र, या उत्पादनाला सरकार भाव देत नसल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत चालला आहे. त्यामुळेच विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु रामदेवबाबा आत्महत्या किंवा इतर कोणत्याही विषयावर काहीच बोलले नाहीत. केवळ शेतकऱ्यांनी उत्पन्न घ्यावे आणि पजंतलीशी जोडले जा, असेच आवाहन ते करत होते. बेरोजगारांच्या संदर्भात ते पूर्व विदर्भासाठी महत्त्वपूर्ण उद्योगाची घोषणा करतील असे सांगण्यात आले होते. मात्र, शेवटपर्यंत ही घोषणा झालीच नाही.  महिला मेळाव्यात तर त्यांनी खाद्य संस्कृती, आरोग्याची निगा आणि बालकांनी समाज माध्यमांचा वापर करू नये यावरच प्रवचन दिले. महिला सक्षमीकरणाच्या हेतूने ते काही बोलतील हे गृहीत धरून महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडेसुद्धा कार्यक्रमाला हजर होत्या. मात्र, या विषयाला तर त्यांनी हातसुद्धा लावला नाही.

योगगुरू रामदेवबाबा यांच्या कार्यक्रमात सरकारी यंत्रणेचा कुठलाही वापर करण्यात आला नाही. पतंजली समिती व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी समितीचे कार्यकर्ते प्रत्येक कामासाठी मागील महिनाभरापासून राबत होते. स्वामीजी देशाला चांगल्या गोष्टी देत आहेत.

– हरीश शर्मा, भाजप जिल्हाध्यक्ष

या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने स्वत:च्या प्रचार व प्रसिद्धीसाठी सरकारी यंत्रणेचा वापर करून घेतला. कृषी मेळाव्यासाठी जिल्हा परिषदेत केवळ दहा लाखाची तरतूद असताना मूल व वरोरा येथे कृषी मेळावे घेण्यात आले. यासाठी सरकारी यंत्रणेला वेठीस धरले गेले.

– डॉ. विजय देवतळे, कॉंग्रेस नेते

Story img Loader