सांस्कृतिक आणि रंगभूमी चळवळीचे प्रेरणास्थान असलेले महाराष्ट्राचे थोर सुपुत्र व ज्येष्ठ शास्त्रीय गायक दिवंगत वसंतराव देशपांडे यांचे सिव्हिल लाईन्समधील वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहातील दुर्मीळ तैलचित्र फाटले असून या दिग्गज कलाकाराच्या स्मृती उजळवणारा हा अमूल्य ठेवा जतन करण्याचे प्रयत्न आतापासूनच न झाल्यास त्याचे नष्टचर्य अटळ आहे.
पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार रघुवीर भरम यांनी ३३ वर्षांपूर्वी दोन महिने अथक परिश्रम घेऊन वसंतराव देशपांडेंचे सजीव तैलचित्र साकारले होते. त्याची धाटणी इतर कोणत्याही व्यक्तिचित्रांपेक्षा अत्यंत वेगळी आहे. इंग्लंडच्या जगप्रसिद्ध विल्सन कंपनीचे तैलरंग चित्रासाठी वापरण्यात आले आहेत. अत्यंत टिकाऊ असे रंग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे आता उडण्याच्या बेतात आहेत. रघुवीर भरम यांनी सभागृह कोटय़वधी संगीत रसिकांच्या भावनांचे प्रतीक असलेल्या या चित्राची जपणूक न झाल्याबद्दल ‘लोकसत्ता’ बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. वसंतरावांसारखे गायक पुन्हा पुन्हा होत नाहीत. त्यांच्या स्मृती अमूल्य आहेत. त्यांचे चित्र काढण्याची संधी मिळणे माझ्यादृष्टीने भाग्याचे होते. या चित्राचे फोटो आपण मागविले असून त्यातून चांगल्यात चांगले देण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
  एकेकाळी धनवटे रंगमंदिर म्हणजे विदर्भातील नाटय़कलावंताचे आश्रयस्थान होते मात्र, १९९२-९३ दरम्यान धनवटे रंगमंदिराची वास्तू पाडण्यात आल्यानंतर विदर्भातील नाटय़ चळवळ जवळपास पोरकी झाल्यासारखीच होती. दरम्यानच्या काळात विदर्भाचे सुपुत्र आणि ज्येष्ठ गायक वसंतराव देशपांडे यांच्या नावाने नागपुरात नाटय़ सभागृह बांधण्याचा प्रस्ताव समोर आला. त्यानंतर सार्वजानिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता कामत यांच्या पुढाकाराने सिव्हिल लाईन भागात वसंतराव देशपांडे सभागृहाची भव्य आणि प्रशस्त अशी दिमाखदार वास्तू उभी राहिली. तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते २२ जानेवारी १९८६ रोजी सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. मूळ विदर्भातील (मूर्तिजापूर) असलेल्या वसंतराव देशपांडेंनी संगीत क्षेत्रात स्वत:चे आगळेवेगळे स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांचे अनेक चाहते देशभर विखुरलेले आहेत. वसंतरावांनी संगीत क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाची आठवण म्हणून नागपुरात बांधलेल्या सभागृहाला वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह असे नाव देण्यात आले.
वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह रसिकांसाठी खुले झाल्यानंतर याच सभागृहात वसंतरावांचे सजीव तैलचित्र लावण्याची कल्पना वसंतरावांचे चाहते व पुणेकर विजय वाडेकर यांना सुचली. गोपाळरावांचे पट्टशिष्य असलेल्या रघुवीर भरम यांच्याशी वसंतरावांचे एक कट्टर चाहते विजय वाडेकर यांचा संबंध आल्यानंतर त्यांनीच वसंतरावांच्या तैलचित्राची संकल्पना मांडली. त्यावेळी वसंतरावांचा नातू राहुल देशपांडे पाचव्या वर्गात शिकत होता आणि तो नुकताच गाणे म्हणू लागला होता हा योगायोग होता. महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांच्याकडे गुरुकूल पद्धतीने चित्रकारितेचे कठोर शिक्षण घेतलेल्या रघुवीर ऊर्फ आर.डी. भरम यांनी वसंतरावांच्या फोटोवरून या तैलचित्राची निर्मिती केली. त्यावेळी रघुवीर भरम एन तिशीत होते. त्यांच्यावर हे तैलचित्र साकारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आणि हा विश्वास त्यांनी सार्थ ठरविला. फोटोतील मूळ चेहरा तैलचित्र घडविताना ‘एनलार्ज’ करण्यात आल्याने ते अत्यंत सजीव असे वाटू लागले. चित्र तयार झाल्यानंतर वसंतरावांचे खास मित्र व प्रख्यात अष्टपैलू साहित्यिक पु.ल. देशपांडे यांना हे चित्र दाखविण्यात आले तेव्हा त्यांचे डोळे अक्षरश: पाणावले आणि ‘माझ्यासमोर साक्षात वसंता उभा आहे’, अशी पावती त्यांनी दिली.
वसंतरावांच्या तैलचित्राचे ३० जुलै १९९० रोजी सभागृहात अनावरण करण्यात आले. तेव्हापासून वसंतराव देशपांडेंचे तैलचित्र त्यांच्या चाहत्यांना प्रेरणा देत आहे. परंतु, या चित्राची जपणूक ज्या पद्धतीने व्हायला हवी त्या पद्धतीने झालेली नाही. फक्त वसंतरावांच्या जयंती आणि पुण्यतिथीला चित्रावरील धूळ साफ केली जाते. अशाच साफसफाईदरम्यान चित्रातील पायाकडचा भाग फाटला असावा. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता वि.ल. मोरोणे यांच्याशी संपर्क साधला असता चित्राचा पायाकडील भाग फाटल्याचे त्यांनी मान्य केले.
चित्राची देखरेख अत्यंत चांगल्या पद्धतीनेच झाल्याने गेल्या ३३ वर्षांपासून चित्र टिकले आहे, असे सांगून मोरोणे म्हणाले, मूळ चित्रकार रघुवीर भरम यांना आम्ही फाटलेल्या चित्राचे फोटो पाठविले असून त्यांनी यात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांचे उत्तर मिळाल्यानंतर येत्या आठ-दहा दिवसात याबाबत पावले उचलण्यात येतील.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा