अहिल्यानगर : मूळ शिवसेनेपासून पूर्वीच दूरावलेले आणि अलिकडच्या काळात शिवसेनेतील फूटीनंतर फाटाफूट झालेले जुने-नवे शिवसैनिक आता पुन्हा एकत्र आले आहेत. वेळोवेळी शिवसेनेतून बाहेर पडलेले हे शिवसैनिक शिवसेनेच्या शिंदे गटातील पक्षप्रवेश तसेच महायुतीच्या माध्यमातून आता पुन्हा एकत्र आले आहेत. मूळ शिवसेना आणि नंतर ठाकरे गटातून बाहेर पडताना या पदाधिकार्यांनी परस्परांवर आगपाखड केली होती, त्याकडे कानाडोळा करत ते शिंदे गट व महायुतीत एक झाले आहेत. एका अर्थाने त्यांच्या पक्षप्रवेशाचे वर्तूळ पूर्ण झाले आहे.

एकत्र आलेल्या या शिवसैनिकांचे मूळचे असलेले गटतट आता नवीन पक्ष आणि महायुतीतही कायम राहणार की, ते एकोप्याने राहणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. त्यासाठी महापालिका निवडणुकीची प्रतिक्षा राहील. याच निवडणुकीचे वेध घेत जुने-नवे शिवसैनिक आता पुन्हा एकत्र आले आहेत.

शहरावर तत्कालीन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे एकहाती वर्चस्व असतानाच, महापालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाच शहर शिवसेनेत फूट पडली व तत्कालीन शहरप्रमुख गणेश भोसले, किशोर डागवाले, दीपक सूळ यांच्यासह ११ नगरसेवक बाहेर पडले होते. हे सर्वजण वेगवेगळ्या पक्षात जाऊन आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजपमध्ये स्थिरावले आहेत. एका अर्थाने ते महायुतीत, म्हणजे एकत्रच आहेत.

त्यानंतर शहर शिवसेनेतून अंबादास पंधाडे, संजय चोपडा, सुभाष लोंढे आदी बाहेर पडले. पंधाडे यांचे निधन झाले, लोंढे काँग्रेस पुन्हा शिवसेना असे करत आता शिंदे गटात आहेत. चोपडा राष्ट्रवादीत. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनिल शिंदे, सचिन जाधव, बाबूशेट टायरवाले आदी बाहेर पडून शिंदे गटात गेले. परंतु मनपातील महापौर पद व सत्तेमुळे शहरप्रमुख संभाजी कदम, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे आदी पंधरा-सोळा नगरसेवक ठाकरे गटाकडेच राहीले. महापौर पदाचा कालावधी व मनपातील सत्ता संपुष्टात येताच तसेच राज्यात शिंदे गट पुन्हा सत्तेत येताच शहरप्रमुखासह हे आठ ते दहा माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले.

त्यामुळे मूळ शिवसेनेतून त्याचवेळी अनिल राठोड यांच्या कार्यशैलीच्या विरोधात बाहेर पडलेले, काम थांबवलेले, नाराजीतून शांत बसलेले जुन्या शिवसैनिकासह अलिकडे पक्षांतर केलेले अनेकजण शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यातून मूळ शिवसेनेतील शिवसैनिकांचे आता शिंदे गटात एकत्रिकरण झाले आहे. काहीजण भाजप, राष्ट्रवादीत असल्याने, महायुतीमुळे एका अर्थाने एकत्रच असल्याचे मानले जाते.

असे असले तरी ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या काहींना भाजपचे माजी खासदार डॉ सुजय विखे तसेच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे. त्याची बीजे मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रोवली गेली आहेत. त्याचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत बसणार का, याकडे नगरकरांचे लक्ष राहणार आहे.

जुन्या-नव्या शिवसैनिकांची एकत्र मोट

हिंदुत्वाचे विचार घेऊन कार्य करणाऱ्या शिवसैनिकांना एकत्र आणले, जुन्या-नवीन सहकाऱ्यांना एकत्रित करून पक्षाची मोट बांधण्यात आली. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला सक्षमपणे सामोरे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणार आहोत अनिल शिंदे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट).