सातारा: साताऱ्यातील माण तालुक्यात तेलदरा येथील वृद्ध शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. ज्योतिराम निवृत्ती शिंदे (वय ७८) असे या शेतकऱ्याचे नाव असून, शिवारात एका झाडाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. दहिवडी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, २१ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ज्योतिराम शिंदे हे घरातून बेपत्ता झाले होते. तीन दिवस घरातील सर्वजण त्यांचा शोध घेत होते. मुलगा योगेश त्यांचा शोध घेत असताना त्यांच्याच मोगल दुती या शिवारात एका झाडाखाली शिंदे मृतावस्थेत आढळले. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद कदम यांनी व्यक्त केला आहे. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली असून, हवालदार आर. एस. गाढवे तपास करत आहेत.
सातारा जिल्ह्यात उष्णतेची दाहकता वाढली आहे. साताऱ्यात ४० अंशांवर, तर माण ४२ अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.