सोलापूर : बार्शी तालुक्यातील बाबुळगाव शिवारात एका वृद्ध शेतकऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह शेतात पुरल्याच्या घटनेची उकल पोलिसांनी यशस्वीपणे केली आहे. मृत शेतकऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी आणि त्याच्याजवळील रोख रक्कम लुटण्यासाठी दोघा जणांनी कट रचला होता.

सुरेश रंगनाथ शिंदे (वय ६८, रा. बाभुळगाव, ता. बार्शी) असे खून झालेल्या वृध्द शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप निवृत्ती झोंबाडे (रा. बाभुळगाव) आणि राहुल नागेश गायकवाड (रा. कैलास, ता. सांगोला) यांची नावे संशयित आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

मृत सुरेश शिंदे हे गेल्या १७ फेब्रुवारी रोजी बार्शी येथून आपल्या गावी जात असताना बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी शोध घेऊनही ते सापडले नाहीत. मात्र २० फेब्रुवारी रोजी दुपारी बाभुळगाव शिवारातील एका उसाच्या शेतामध्ये उसाला पाणी देत असताना मातीतून एक मानवी पाय आढळून आला. त्याची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जमिनीमध्ये पुरलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याची ओळख पटली. मृतदेहाचे दोन्ही हात शर्टाने बांधलेले होते आणि गळ्यावर फास देऊन आवळल्याच्या खुणा होत्या. पांगरी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास हाती घेतला असता संशयावरून सालगडी राहुल गायकवाड आणि दिलीप झोंबाडे यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक व तांत्रिक तपासातून या दोघांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून आले. मृत सुरेश शिंदे यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि त्यांच्याजवळील रोख रक्कम लुटण्यासाठी त्यांचा खून करण्यात आला आणि गुन्ह्याचा पुरावा लपविण्यासाठी मृतदेह शेतात पुरण्यात आला होता.

Story img Loader