रत्नागिरी – तालुक्यातील पाली-पाथरट येथे गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाली पाथरट मावळटवाडी येथे राहणाऱ्या इंदिरा शांताराम धाडवे (वय ७५) यांच्यावर दडी मारून बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात इंदिरा धाडवे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पाली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा धाडवे यांचा मुलगा सुभाष बाजूला चुलीजवळ पाणी तापवत बसला होता म्हणून त्या वाचल्या. त्याने तत्काळ पेटलेले लाकूड घेऊन धाव घेतल्याने बिबट्या पळून गेला. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात इंदिरा धाडवे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने मुलगा आणि इतर माणसे बाजूलाच असल्यामुळे इंदिरा धाडवे यांचा जीव वाचला.
मागील दोन वर्षांपासून बिबट्याचा वावर या भागात आहे हे निदर्शनास आणूनसुद्धा वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. या आधीही खानु गावात अशी घटना घडली होती. यामुळे जनमानसात खूप भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी लवकरात लवकर यावर उपाययोजना करण्यात यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.