राज्यातील करोनाचे संकट जरी ओसरल्याचे दिसत असले, तरी देखील आता ‘ओमायक्रॉन’ रूपी संकट डोकं वर काढत आहे. राज्यात आज दिवसभरात आणखी ८ रूग्ण ‘ओमायक्रॉन’ बाधित आढळले आहेत. तर, आजपर्यंत राज्यात एकूण ४८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर ३ रुग्ण सातारा येथे आणि १ रुग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहेत.
एकूण ४८ ओमायक्रॉन बाधितांमध्ये मुंबई – १८, पिंपरी चिंचवड -१०, पुणे ग्रामीण- ६, पुणे मनपा -३ , सातारा – ३, कल्याण डोंबिवली – २, उस्मानाबाद -२, बुलढाणा-१ नागपूर -१ ,लातूर -१ आणि वसई विरार -१ अशी रूग्ण संख्या आहे. तर, यापैकी २८ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या ८ रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
मुंबईतील चारही रूग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून शोधण्यात आले आहेत. यातील एक रूग्ण मुंबईतील आहे. इतर ३ रुग्ण छत्तीसगड, केरळ आणि जळगाव येथील रहिवासी आहेत. यातील दोघांनी दक्षिण आफ्रिकेचा, एकाने टांझानियाचा तर एकाने इंग्लंडचा प्रवास केलेला आहे. हे चारही जण पूर्ण लसीकरण झालेले आणि लक्षणविरहित आहेत. सर्वजण सध्या विलगीकरणात आहेत.
सातारा येथील ३ रुग्ण –
हे पूर्व आफ्रिकेचा प्रवास केलेले एकाच कुटुंबातील सदस्य असून हे सर्वजण लक्षणेविरहित आणि विलगीकरणात आहेत. यातील ८ वर्षाची मुलगी वगळता इतर दोघांचे लसीकरण झालेले आहे.
पुणे येथील एक रुग्ण हा आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशाचा निकटसहवासित असून १७ वर्षाच्या या मुलीला कोणतीही लक्षणे नाहीत. ती १८ वर्षाखालील असल्याने तिचे लसीकरण झालेले नाही.
राज्यात दिवसभरात ८५४ नवीन करोनाबाधित –
राज्यात दिवसभरता ८५४ नवीन करोनाबाधित आढळले असून, ८०४ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९६,७३३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.७१ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज ११ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,७५,७०,९३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४८,६९४ (९.८४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ८०,०३९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ८८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.