दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या करोनाच्या ओमिक्रोन या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. काही देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी देखील घातली आहे. हा नवा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचा प्राथमिक अंदाज शास्त्रज्ञ वर्तवत आहेत. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील बैठक घेऊन चर्चा केलेली असताना महाराष्ट्रात या व्हेरिएंटचा प्रभाव आणि परिणाम कितपत आहे किंवा जाणवू शकेल, याविषयी नागरिकांमध्ये संभ्रमयुक्त भिती दिसून येत आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यामध्ये बोलताना खुलासा केला आहे.

राज्यात कितपत धोका?

ओमिक्रोन व्हेरिएंटमुळे देशात आणि महाराष्ट्रात त्याचा लगेच परिणाम व्हावा अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. “दुसरी लाट डेल्टाने निर्माण केली, तशी तिसरी लाट अशा वेगळ्या एखाद्या व्हेरिएंटमुळे निर्माण होण्याची शक्यता असली, तरी त्याचा प्रसार आपण वेळेत थांबवला, तर आज चिंता करण्याचं कारण नाही. फक्त सतर्क राहावं लागेल एवढं मात्र नक्की”, असं राजेश टोपे म्हणाले.

राज्यात अद्याप ओमिक्रोन आढळलेला नाही

“आपण प्रत्येक जिल्ह्यातून साधारणपणे महिन्याला १०० सॅम्पल्स घेतो. त्यांचं जिनोमिक सिक्वेन्सिंग करतो. त्यातून डेल्टा व्हेरिएंटच आहे की अजून काही नवीन व्हेरिएंट आहेत हे तपासत असतो. हा प्रकल्प अजूनही सुरूच आहे. त्यात अजून तरी नवीन कोणताही नवीन व्हेरिएंट आढळलेला नाही. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचं काम आपण करू”, असं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

शाळा सुरू होणार…

ओमिक्रोन व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये आढळल्यानंतर त्याची भिती महाराष्ट्रात देखील जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर १ डिसेंबरपासून राज्य सरकारने सर्व शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय फिरवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर बोलताना राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “१ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वर्षा गायकवाड यांच्या या प्रस्तावावर आमच्या विभागाचं ना हरकत आहे. त्यानुसार अंमलबजावणी होईल. तरीदेखील मुख्यमंत्री उद्या संध्याकाळी संपूर्ण प्रशासन आणि आरोग्य विभागाची व्हीसी घेऊन आढावा घेणार आहेत”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

करोनाच्या Omicron व्हेरिएंटची दहशत; मुंबई महानगर पालिकेनं घेतला मोठा निर्णय!

“WHO च्या सूचनांनुसार निर्णय घेऊ”

“जागतिक आरोग्य संघटनेनं हे मान्य केलं आहे की हा एक नवीन व्हेरिएंट आहे. त्याचं स्वरूप अधिक समजून घेण्यासाठी अभ्यास सुरू आहे. त्यानुसार ते सगळ्याच देशांना कळवतील. आपल्याला त्यांच्या सूचना येतील, त्यानुसार आपण काम करू. देशात सध्या अशा प्रकारचा कोणताही नवीन व्हेरिएंट आढळलेला नाही. तातडीच्या सूचना आपण दिल्या आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या वेगवेगळ्या प्रदेशातून येणाऱ्या लोकांना ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केलं आहे. ते आल्यानंतर त्यांचे आपण स्वॅब घेत आहोत. अजूनही त्यांच्या विमानांवर पूर्णपणे बॅन केलेला नाही”, असं टोपेंनी स्पष्ट केलं.

Story img Loader