मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या डोंबिवलीमध्ये दक्षिण आफ्रिकेवरुन आलेल्या एका रहिवाशाला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडालीय. ‘ओमायक्रॉन’ हा नवा व्हेरिएंट ज्या देशांमध्ये पसरलाय त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेतच असल्याने या प्रवाशाला या नवीन प्रकारच्या घातक करोनाची लागण झालेली नाही ना याची सध्या खातरजमा करुन घेतली जात आहे. असं असतानाच दुसरीकडे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘ओमायक्रॉन’संदर्भातील महत्वाची घोषणा केलीय.
नक्की वाचा >> ‘ओमिक्रॉन’बद्दल उगाच भीती निर्माण केली जातेय?; पहिल्यांदा इशारा देणाऱ्या दक्षिण आफ्रिकन महिला डॉक्टर म्हणतात, “अनेक रुग्ण तर…”
डोंबीवलीमध्ये आफ्रिकेतून आलेल्या करोनाबाधित व्यक्तीची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती टोपेंनी दिली. तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर या देशांतून येणाऱ्या विमानांना बंदी घालावी याबाबतचा निर्णय राज्याने घ्यावा का याबाबत देखील चर्चा झाल्याचं म्हटलं टोपेंनी स्पष्ट केलं आहे. डोंबिवलीमध्ये आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीची तब्बेत आज चांगली असून ही व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आली आहे. त्यांच्यामधील जिनोमिक सिक्वेन्सींगसाठीचा स्वाब हा चाचणीसाठी पाठण्यात आला आहे. याबाबतची माहिती लवकरच प्राप्त होईल तसेच या केसकडे विशेष लक्ष ठेवलं जात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डाॅ. प्रतिभा पानपाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीत आफ्रिकेतून आलेलल्या करोनाबाधित रुग्णाचे अहवाल जनुकीय गुणसूत्र तपासणीसाठी मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. यासंदर्बातील अहवाल सात दिवसांमध्ये मिळेल. तो पर्यंत या रुग्णावर पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं लक्ष असणार आहे. त्याच्या उपचारांसंदर्भातील सर्व माहिती आणि तपशील वेळोवेळी पालिका कर्मचाऱ्यांकडून तपासला जाईल असं यामधून स्पष्ट होत आहे.
नक्की वाचा >> ताप आला, कुटुंबाला फोन केला अन्… ‘ती’ व्यक्ती आफ्रिकेमधून डोंबिवलीत येईपर्यंत काय काय घडलं?
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘ओमायक्रॉन’ संदर्भात चर्चा झाली असून १२ देशांतून आलेल्या नागरिकांना ४८ तास आधीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटीव्ह असणं बंधनकारक असणार आहे.शिवाय दोन डोस घेणं बंधनकारक राहणार असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. ‘ओमायक्रॉन’चा सर्वाधिक धोका असणाऱ्या १२ देशांमधून आलेल्या नागरिकांना सात दिवस कवारंताईन राहणं बंधन कारक राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. ते जालन्यात बोलत होते.
आंतरराष्ट्रीय विमानतळांवर या देशांतून येणाऱ्या विमानांना बंदी घालावी याबाबतचा निर्णय राज्याने घ्यावा याबाबत देखील मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाल्याच टोपे म्हणाले. या १२ देशा व्यतिरीक्त इतर देशातून आलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी बंधंकारक करायची का याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले.
आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमायक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी परदेशी प्रवाशांच्या चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण आणि त्यांचा प्रवास इतिहास नोंदवण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत.