धाराशिव : आजवर झालेल्या एकूण १७ लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या स्नूषा व भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा ओमराजे यांनी तब्बल तीन लाख २९ हजार ८४६ मतांनी पराभव केला आहे. ओम राजेनिंबाळकर यांना सात लाख ४८ हजार ७५२ तर अर्चना पाटील यांना चार लाख १८ हजार ९०६ इतकी मते मिळाली आहेत. या ऐतिहासिक विजयानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात शहराच्या हमरस्त्यावरून मिरवणूक काढली.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राजेनिंबाळकर आणि पाटील कुटुंबातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे या निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा वेळोवेळी पहावयास मिळत होता. ओम राजेनिंबाळकर यांच्यासाठी उध्दव ठाकरे यांनी मतदारसंघात तब्बल सहा जाहीर सभा घेतल्या. तर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली होती. कागदावर बलाढ्य असलेल्या महायुतीचा विजय सहज होईल, असे आडाखे अनेकांकडून बांधले जात होते. त्या सर्व आडाख्यांना बाजूला सारत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे.
मंगळवारी शहरातील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन प्रशालेत सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरूवातीला टपाली मतदान मोजण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान यंत्रांवरील मतदानाची मोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीपासून ओम राजेनिंबाळकर यांनी आघाडी घेतली होती. अखेरच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम राहिली. एकाही फेरीत महायुतीच्या अर्चना पाटील यांना आघाडी घेता आली नाही. लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लक्षवेधी मताधिक्य खेचून घेतले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते असलेल्या प्रा. तानाजी सावंत यांच्या भूम-परंडा-विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. त्यापाठोपाठ बार्शी, तुळजापूर, औसा, उमरगा आणि लोहारा विधानसभा मतदारसंघातूनही ओमराजे यांना मतदारांनी भरभरून कौल दिला आहे. उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघातून ५० हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य राजेनिंबाळकर यांच्या पारड्यात पडले आहे.
सातत्यपूर्ण कामाचा विजय : राजेनिंबाळकर
मोदी यांच्या लाटेमुळे आपण निवडून आलो असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात होता. तो या निवडणुकीत खोटा ठरला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यामुळे मागील निवडणुकीतही आपण विजयी झालो होतो. सातत्यपूर्ण काम आणि सर्वसाधारण मतदारांसोबत असलेला संपर्क याच्या बळावरच मतदान करण्याचे आवाहन आपण केले होते. काम केले असेल तर मागील वेळेपेक्षा किमान एक मत यावेळी जास्त द्या, असे आवाहन केले आणि मतदारांनी दिलेला कौल आपल्या कामाची पावती असल्याची आणि भविष्यातील जबाबदारी अधिक गांभीर्याने पार पाडण्यासाठी दिलेला आशीर्वाद असल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली.