महापालिका विसर्जित होऊन एक वर्ष गेलं. मात्र निवडणुका घेण्याची हिंमत बेकायदेशीर सरकारमध्ये नाही. पैसा उधळला जातो आहे, जाब विचारणारं कुणी नाही. पावसाप्रमाणे निवडणुकाही लांबत चालल्या आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. मुंबईला कुणी मायबापच राहिलेला नाही. जे काही सुरु आहे ते लुटालूटच आहे. शिवसेना आता महापालिकेवर १ जुलैच्या दिवशी विराट मोर्चा काढणार आहे अशीही घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ जुलैला शिवसेनेचा विराट मोर्चा

मुंबई महापालिकेच्या ठेवींमधूनच विकासकामं केली जात आहेत. आत्तापर्यंत बराच पैसा याच एफडींमधून वापरला गेला आहे. हा सगळा जनतेचा पैसा आहे. या जनतेच्या पैशांच्या लुटीचा हिशोब द्यावाच लागेल. १ जुलैला आम्ही विराट मोर्चा काढणार आहोत. मुंबईकरांच्या मनातल्या असंतोषाला आम्ही वाचा फोडणार आहोत. या सगळ्यांना जाब विचारणारं कुणी नाही. एक काळ असा होता की मुंबई महापालिका ही ६५० कोटी तुटीत होती. आता ९२ हजारांच्या ठेवीपर्यंत ही मुंबई महापालिका गेली आहे. हे सगळे पैसे महापालिकेच्या ठेवी होत्या. कोस्टल रोड, जनतेच्या उपयोगाची कामं सुरु होती. आता कोणतंही काम असेल तरीही महापालिकेचा पैसा बेधडकपणे वापरला जातो आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृ्त्त्वात हा मोर्चा निघणार आहे.

माझ्या कानावर असं आलं आहे की सात ते आठ हजार कोटी त्या एफडीमधून वापरले गेले आहेत. या पैशांचा हिशोब द्यावाच लागेल. येत्या १ जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा आम्ही काढणार आहोत अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. आत्ता हे जे बेकायदेशीर सरकार सांगतं आहे ते म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. चोरच चोर-चोर ओरडू लागला की लोक दुसरीकडे पाहू लागतात तसं हे सरकार करतं आहे. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

गद्दार कितीही काहीही झालं तरी गद्दारच राहणार. लोकांच्या मनात यांच्याविरोधात असंतोष आहे त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. त्यांच्या नेत्यांवर जे आरोप होत आहेत त्यांना क्लिन चीटच मिळत आहेत याला काहीही अऱ्त नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On july 1 shiv sena uddhav balasaheb thackeray party will march on the bmc demanding accountability for corruption said uddhav thackeray scj
Show comments