वाई: पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाट सातारा बाजूकडे उतरताना असणाऱ्या वेळे (ता. वाई) गावाच्या हद्दीत असण्याऱ्या घाट उताराच्या तीव्र वळणावर भर पावसात एक कंटेनर महामार्ग रस्त्यावर आडवा झाला. यामुळे काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
पुणे-सातारा महामार्गावरील खांबाटकी घाट उतरल्यानंतर वेळे गावाच्या हद्दीत पावसाच्या निसरड्या रस्त्यावर कंटेनर (गाडी क्रमांक एमएच ०९. एफएल ११०५) या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर जागेवरच उलटा फिरला. यावेळी कंटेनरचे तोंड विरुद्ध बाजूला झाले. सुदैवाने या अपघातात चालक बाबुराव आप्पाबा पाटणे (वय – २२ रा . अक्कलकोट जि. सोलापुर ) हे थोडक्यात बचावले. तसेच इतरही वाहनांचा अपघात घडला नाही. यावेळी रस्त्यावर वाहनांची संख्या तुरळक असल्याने मोठा अनर्थ टाळला. या कंटेनर मध्ये कसलाही माल नव्हता .
हा अपघात आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. त्यानंतर भुईंज महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.