पंढरपूर : राज्यात बुधवारी सर्वत्र रंगपंचमी साजरी होत असताना पंढरीच्या सावळ्या विठुरायासोबतही त्याच्या भक्तींनी रंग खेळले. विठुरायावर केशर आणि गुलालाची उधळण करण्यात आली. या अनोख्या रंगपंचमीने ‘अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग!’ या अभंगाची प्रचिती आली. वसंतपंचमी ते रंगपंचमी असा एक महिना देवाला पांढरा पोशाख केला जातो. दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी रंगांची मुक्तपणे उधळण करीत रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.

वसंत पंचमीला विठ्ठलाचा विवाह सोहळा असतो. तो झाल्यावर देवाला म्हणजेच श्री विठ्ठलाला पांढरा पोशाख घातला जातो. त्या दिवसापासून ते रंगपंचमीपर्यंत देवाच्या अंगावर केशरी रंग लावला जातो. रंगपंचमीला सकाळी १० वाजता देवाला नैवेद्य दाखवला. त्यानंतर पोशाखावर केशरापासून तयार केलेला नैसर्गिक रंग उधळण्यात आला. दुपारी ४ वाजता विठुरायाला पांढराशुभ्र पोशाख आणि रुक्मिणीमातेस पांढरी साडी परिधान करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा केशरी, गुलाल, बुक्का अशा नैसर्गिक रंगाची उधळण केली. या दिवशी पंचक्रोशीतील नागरिक आणि भाविक देवाला रंग लावण्यास आवर्जून आले होते.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी देवाची पूजा केली. त्या नंतर पारंपरिक पद्धतीने मंदिर समितीच्या वतीने डफ मिरवणूक नामदेव पायरी येथून निघाली. यावेळी नागरिक आणि भाविकांनी कोरड्या गुलालाची मुक्त उधळण करीत रंगोत्सवाची सांगता झाली. याचबरोबर बडवे, उत्पात यांचेदेखील डफ मिरवणूक परंपरेप्रमाणे निघाले. डफाची मिरवणूक सुरू झाली किंवा डफ वाजला की रंगपंचमी संपली असा एक नियम आहे. रंगात न्हाहून निघालेला श्रीरंग म्हणजेच सावळ्या विठुरायाचे आजचे लोभस रूप डोळ्यात साठवून भाविक तृप्त झाले.

Story img Loader