मराठवाडय़ात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. अशा स्थितीत केंद्र व राज्य सरकार एकाच पक्षाचे असल्याने या विभागातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी करून सरकारने अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे दुष्काळी स्थितीची पाहणी केल्यानंतर सायंकाळी बीड येथे पत्रकार बठकीत पवार बोलत होते. आमदार जयदत्त क्षीरसागर, अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, अशोक डक उपस्थित होते. पवार म्हणाले, की पावसाअभावी मराठवाडय़ात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. मात्र, नागपूर हिवाळी अधिवेशनात सरकारला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निर्णय घेण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून भाग पाडू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली. मात्र, सरकारने अजून निर्णय घेतला नाही. अधिवेशनात योग्य निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
शेतकऱ्यांना पीककर्ज, वीजबिल माफी व कापूस उत्पादकांना थेट अनुदान द्यावे, पशुधन जगवण्यास चारा डेपो व छावण्या सुरूकराव्यात अशी सूचना त्यांनी केली. जनावरांसाठी ऊस, चारा आणून राखीव ठेवावा लागेल तरच जनावरे जगतील, अशी मागणीही त्यांनी केली.
‘नाचता येईना अंगण..’!
गेल्या १५ वर्षांत आघाडी सरकारने सव्वातीन लाख कोटी कर्ज करून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणे अवघड जात असल्याच्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या आरोपावर आमदार अजित पवार म्हणाले, की विरोधी पक्षात असताना बोलणे सोपे असते. केंद्रात व राज्यात तुमच्याच पक्षाचे सरकार आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे सोडून कर्जाचा कांगावा करूनये. आघाडी सरकार सत्तेत आले तेव्हाही राज्यावर कर्ज होतेच, कर्ज हे पत बघून दिले जाते. त्यामुळे ‘नाचता येईना अंगण..’ असा टोला त्यांनी लगावला. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळाले पाहिजे, असा दावाही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा