सातारा: पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास महामार्गाच्या रस्त्यावर ऑइल सांडल्याने अनेक वाहनांची घसरगुंडी झाली. पावसाळी वातावरण असल्याने ऑइलचा तवंग महामार्गावर इतरत्र पसरला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, यात काही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी होऊन वाहतूक संथ झाली होती.
आज पहाटे घाटातील भैरवनाथ मंदिराजवळ असणाऱ्या वळणावर एका गाडीचे ऑइल किमान शंभर मीटर परिसरात पसरले. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तर, काही गाड्या घसरून कठड्यास धडकल्या. यात गाडींचे किरकोळ नुकसान झाले. मात्र, कसलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, महामार्ग पोलीस व खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन एकेरी वाहतूक सुरू केली. या घाटात सकाळपासून एकेरी वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. विकेंड असल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
दरम्यान, आज सकाळी खंडाळा शहरातील टँकर व अग्निशामक यंत्रणा यांना बोलून रस्त्यावर पाणी मारण्यात आले. मात्र, तरीही रस्ता निसरडाच राहिला आहे. यानंतर दुपारी या महामार्गावर माती टाकून रस्त्यावरील ऑइलचा थर कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तरीही ऑइलच्या तवंग रस्त्यावर दिसून येत असल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. यासाठी महामार्ग पोलिसांनी मोठी मेहनत घेतली.