सोलापूर : सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर शहरानजीक कुंभारी टोल नाक्याच्या अलीकडे एका धावत्या एसटी बसला अचानकपणे आग लागली. काही क्षणांतच संपूर्ण बसला आगीने लपेटले. सुदैवाने एसटी बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूपपणे आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ही घटना घडली.
गाणगापूर येथून अक्कलकोटमार्गे कुर्डूवाडीकडे निघालेली एसटी बस (एमएच २० बीएल ४२१५) सोलापूरनजीक कुंभारी टोल नाक्याजवळ आली असताना बसच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे बसचालक प्रशांत पांचाळ (कुर्डूवाडी आगार) यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखून बसवाहकासह सर्व प्रवाशांना आग लागल्याची धोक्याची सूचना दिली. त्यावेळी बसमध्ये ४५ ते ५० प्रवासी होते.
दरम्यान, बसच्या इंजिनमधून धूर वाढला आणि पाठोपाठ आग लागल्याचे पाहताच चालक आणि वाहकाच्या सूचनेनुसार सर्व प्रवाशी आपापल्या सामानासह बसच्या आपत्कालीन दरवाजातून सुखरूपपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, आगीने संपूर्ण एसटी बसला लपेटले आणि त्यात संपूर्ण बस जळून खाक झाली. वळसंग पोलिसांनी या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन यंत्रणाही धावून आली.