धाराशिव : बीडनंतर धाराशिव जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या हिंसक आंदोलनामुळे जिल्हाधिकार्यांनी लागू केलेली संचारबंदी बुधवारी सायंकाळी ५ वाजता मागे घेण्यात आली. जमावबंदीचे आदेश कायम आहेत. दरम्यान दुसर्या दिवशीही शहरात कडकडीत बंद होता. आंदोलनाच्या आठव्या दिवशी विविध संघटनांनी साखळी उपोषणात सहभाग नोंदविला असून आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी जिल्हा विधीज्ञ मंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. संचारबंदी उठवल्यानंतर व्यापारी व सामान्यांचे दैनंदिन व्यवहार पुन्हा नियमित सुरू झाले आहेत. बुधवारी कुठेही हिंसक आंदोलन झाले नाही. परंतु गावोगावी शांततेत साखळी उपोषण सुरू होते.
हेही वाचा >>> राज्यात सार्वजनिक मालमत्तेचं किती नुकसान? किती गुन्हे दाखल? कुठं इंटरनेट सेवा ठप्प? पोलीस महासंचालक म्हणाले…
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी अंतरवली येथे मनोज जरांगे-पाटील हे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्यावतीने मागील आठ दिवसांपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे. बुधवारी विविध खेडेगावातील युवकांनी उपोषण केले. दरम्यान जिल्हा विधीज्ञ मंडळाने सलग दुसर्या दिवशी आंदोलनास पाठींबा दिला. तसेच जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना आंदोलकांवर नोंदविण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगारांनी बससेवा बंद ठेवली आहे. हिंसक आंदोलनात बसगाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहेत. दोन दिवस शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही शाळांमध्ये दिवाळी सुट्ट्यांपूर्वीच्या प्रथम सत्राच्या परिक्षा सुरू आहेत. मात्र ऐनवेळी संचारबंदी लागू झाल्याने या परिक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. बुधवारी सायंकाळी 5 वाजेपासून संचारबंदी उठवण्यात आल्याने पुन्हा दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहेत. दरम्यान जमावबंदीचे आदेश कायम असून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हादंडाधिकारी ओम्बासे यांनी दिले आहेत.