Chennai Coromandel Express Accident : ओडिशातील तीन ट्रेनची एकमेकांना धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. काल, शुक्रवारी (२ जून) सायंकाळी सातच्या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातात आतापर्यंत २३८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तर, ६५० हून अधिक प्रवासी जखमी असल्याचंही सांगण्यात येतंय. या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणावरून केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यायला हवा, असं वक्तव्य ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं आहे. आज ते नाशिक दौऱ्यावर असून, तिथे त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, “या अपघाताविषयी मी कालपासून पाहतोय. खरंतर रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ज्या प्रकराचा अपघात झालाय, पूर्णपणे बेफिकीर. तीन रुटवरून तीन गाड्या आल्या आणि टक्कर झाली. स्वतः रेल्वे मंत्री ओडिसाचे आहेत. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. इतिहासात लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वे अपघात झाल्यानंतर राजीनामा होता. माधवराव शिंदे यांनी दिला होता. त्यामुळे त्यांनीही राजीनामा द्यावा”, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >> Odisha train accident : भीषण अपघातानंतर ओडिशामध्ये दुखवटा, मृतांच्या नातेवाईकांना १२ लाखांची मदत जाहीर
चौकशीचे आदेश
दरम्यान, काल (२ जून) सायंकाळी हा अपघात झाल्यानंतर आश्विनी वैष्णव आज सकाळीच घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांना याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघात का घडला, कसा घडला यासंबंधित चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा घटनास्थळाची पाहणी करायला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई म्हणून १२ लाख रुपये जाहीर करण्यात आले आहेत.