उन्हाच्या काहिलीवर वळवाच्या पावसाने काही प्रमाणात शिडकावा केला असतानाच आता मान्सूनच्या आगमनाचे पडघमही वाजू लागले आहेत. रविवापर्यंत मान्सून केरळात थडकण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. नैऋत्य मान्सूनने शुक्रवारी श्रीलंकेत पाऊल ठेवले असून लवकरच तो केरळबरोबरच तामिळनाडू, लक्षद्वीप बेटे आणि अरबी समुद्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
 गेल्या सोमवारपासून अरबी समुद्रावर रेंगाळलेला नैऋत्य मान्सून शुक्रवारी आणखी पुढे सरकला. त्याचबरोबर त्याने काही मालदीव बेटे, कोमेरिन परिसर, श्रीलंकेचा निम्मा परिसर व्यापला. आता तो भारताच्या मुख्य भूमीच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. येत्या दोन दिवसांत म्हणजे रविवापर्यंत तो केरळात दाखल होण्यास अनुकूल वातावरण आहे, असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी मान्सून ३ जून रोजी केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान, सध्या देशाच्या काही भागात उष्णतेची लाट पसरली आहे, तर मध्य महाराष्ट्र, कोकण-गोव्यासह देशाच्या मध्य, दक्षिण व पूर्व भागात वादळी पावसाने हजेरी लावली आहे.