नवरात्रोत्सवात राज्यात तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पहिल्या दोन मंत्रिमंडळ विस्तारात संधी हुकलेले भरत गोगावले यांच्या गळ्यात तिसऱ्या वेळी तरी माळ पडेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावरून शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठा दावा केला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार बरखास्त झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे मंत्रिमंडळही बरखास्त झालं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्यभरातून टीका झाल्यानंतर या नव्या सरकारने १४ ऑगस्ट २०२२ रोजी पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात मोजक्यांनाच संधी मिळाली. त्यामुळे उर्वरित इच्छुकांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाईल, असं आश्वासन देण्यात आलं.

हेही वाचा >> रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम; भरत गोगावले म्हणाले, “वर्णी लागत नाही तोवर…”

२ जुलै रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेल्या आठ आमदारांना मंत्रिपदे मिळाली. या दुसऱ्या विस्तारातही शिंदे गटातील आमदारांना डावलण्यात आलं. यामध्ये महाडचे आमदार भरत गोगावले यांचाही समावेश आहे. मंत्रिपदाची आस आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावलेंनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. तरीही त्यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ अद्यापही पडलेली नाही. आता तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. नवरात्रौत्सवात तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये त्यांना संधी दिली जाईल, असा विश्वास कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला.

“मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगावेलंचं नाव होतं. परंतु, त्यांनी त्यांच्या मनाचा मोठे दाखवला आहे. जेणेकरून पुढे अडचण येऊ नये. पण ते निश्चित पालकमंत्री होतील, असा रायगडवासियांचा विश्वास आहे. मला वाटतं नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भरत गोगावले पालकमंत्री होतील. ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे”, असं महेंद्र थोरवे म्हणाले. दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी घटस्थापना आहे. त्यामुळे महेंद्र थोरवे यांनी केलेल्या दाव्यानुसार ते १५ तारखेला पालकमंत्री होण्याची शक्यता आहे. तसंच, देवीच्या मनात असेल तर नवरात्रीतच मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.