काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी लॉन्जीटय़ूड पाईप वापरायची की स्पायरल वेल्डेड यावरून गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले. समर्पक उत्तर मिळत नसल्याचे कारण पुढे करीत नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत सभात्याग केला.
दोन्ही प्रकारच्या पाईपलाईनच्या खर्चात फारसा फरक नसल्याचे विधान जल अभियंता मनीष पवार यांनी केल्याने त्यावरून चर्चेचा फड रंगला. त्याला प्रतिवाद करताना सदस्यांनी यापूर्वी झालेल्या सभेवेळी प्रशासनाने स्पायरल वेल्डिंगसाठी ७२ कोटी रुपये जादा खर्च येणार असल्याचे का सांगितले होते या मुद्यावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. शिवाय या विषयाला अर्थपूर्ण किनार मिळून आक्रमक सदस्यांनी प्रशासनाने सुचवलेले ७२ कोटी रुपये कोणाच्या घशात जाणार होते? असा खोचक सवाल उपस्थित करत प्रशासन आणि कंत्राटदार यांनी ‘मिलीभगत’ असल्याचा आरोप करतानाच सभागृहाची दिशाभूल केली जात असल्याकडे लक्ष वेधले.
या विषयावरून सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. त्यावर गत सर्वसाधारण सभेप्रमाणे उत्तर देण्याची जबाबदारी प्रशासनातील प्रमुख या नात्याने पुन्हा एकदा आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी घेतली. त्यांनी दोन्ही प्रकारच्या पाईपलाईनमधील गुणदोष स्पष्ट केले. पण त्यावरूनही सदस्यांचे समाधान झाले नाही. उलट समर्पक उत्तर मिळत नसल्याचे कारण पुढे करीत जयंत पाटील, महेश कदम, यशोदा मोहिते, मुरलीधर जाधव आदी नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत सभात्याग केला. सभेत शासनामार्फत घोषित असलेल्या झोपडपट्टीधारकांना ५०० चौ. फूट पर्यंतची त्यांची राहती घरे स्वमालकीची करून देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तर बोन्द्रेनगर पुईखडी या सहल आरक्षणामध्ये समाविष्ट असलेल्या जागेवर घनकचरा डंिपग करण्याचा नगररचना विभागाचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा