‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना आपण आवर्जून त्याला पुढल्या वर्षी लवकर यायला सांगतो. त्यानंतर पुढचे वर्षभर आपण बाप्पांची तितक्याच आतुरतेनं वाट पाहत असतो. मग आगमनाला काही दिवस उरले की घराघरांत बाप्पासाठी मखर, फुलांची आरास, नैवेद्य तयार करण्याची लगबग सुरू होते. देशभरात अकरा दिवस गणेशोत्सवाची धूम असते.

मात्र अनेक घरघुती गणपतींचं विसर्जन हे दीड दिवसांनी होतं. आता दीड दिवसांनी बाप्पाचं विसर्जन करण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. अनेकांना वेळ नसतो, मुलं कामाला जाणारी असतात तेव्हा बाप्पांची दहा दिवस काही सेवा करता येत नाही. ही कारणं असली तरी दीड दिवसानं मूर्ती विसर्जन करण्यामागची परंपरा काही वेगळीच आहे.

प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी यामागची एक गोष्ट सांगितली. भारत हा कृषीप्रधान देश आहे. तेव्हा भाद्रपद महिन्यात साधारणं चतुर्थीच्यादरम्यान धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. चतुर्थीला धरणीमातेचे आभार मानले जातात. धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी बांधावरच मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जायची.  पूजा केल्यानंतर त्याचदिवशी या मूर्तीचं नदीत विसर्जन केलं जायचं. नंतर जसजशी वर्षे जाऊ लागली तसा या परंपरेत बदल होऊ लागला. अनेकजण सुबक मातीची मूर्ती तयार करून ती घरी आणू लागले. तिची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर त्या मूर्तीचं विसर्जन करू लागले आणि हळूहळू दीड दिवस गणपती पूजनाचा पायंडा पडू लागला. मात्र अनेक ठिकाणी चतुर्थीच्याच दिवशी मूर्तीपूजा करून तिचं विसर्जन करण्याची प्रथा आजतागत कायम ठेवण्यात आलीये. विशेष करून दक्षिणेकडील अनेक गावांत चतुर्थीच्या दिवशीचं मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आजही कायम आहे.

Story img Loader