राज्यात भाजपची आतापर्यंत ९३ लाख सदस्य नोंदणी झाली. लवकरच हा आकडा एक कोटीपर्यंत जाईल, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी सांगितले.
पक्ष सदस्य नोंदणीस ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे राज्य, तसेच जालना जिल्ह्य़ातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पुढील काळात सदस्य नोंदणीच्या कामात अधिक गती द्यावी. आपण सुरुवातीपासून भाजपत असून, एकेकाळी लोकसभेत दोन सदस्य असणाऱ्या हा पक्ष जनतेच्या पाठिंब्यामुळे केंद्रातील सत्ताधारी पक्ष बनला आहे, असे दानवे यांनी सांगितले.
औरंगाबाद महापालिकेत भाजप-शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवावी, या साठी आपण प्रारंभापासून प्रयत्नात आहोत. काही महत्त्वाच्या जागांवर दोन्ही पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असले, तरी ते मिटणार असून युती होईल, याबद्दल आपल्या मनात कोणतीही शंका नाही. औरंगाबाद महापालिका शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात येईल. कारण आमच्यासमोर विरोधी पक्षांची मोठे आव्हान नसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जालना शहराजवळ मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टअंतर्गत ड्रायपोर्ट उभारण्यात येणार असून शासकीय पातळीवर या साठी जागा हस्तांतरणाचा आदेश निघाला आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादऐवजी जालना येथून १ मे पर्यंत सुटेल. त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे. जालना रेल्वे स्थानकावरील विविध कामांसाठी केंद्रीय रेल्वे बोर्डाने २ कोटी निधी दिला असल्याचेही दानवे यांनी सांगितले.
सोमवारी भाजपच्या जिल्हा कार्यालयात खासदार दानवे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. बदनापूरचे आमदार नारायण कुचे, माजी आमदार अरविंद चव्हाण, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा