मुंबई : गणिती प्रारूपानुसार करोनाच्या चौथ्या लाटेचा इशारा आयआयटी कानपूरने दिला असला तरी करोनाचे नवे उत्परिवर्तन न झाल्यास आणि लसीकरण पूर्ण केल्यास पुढील सहा ते नऊ महिने देशाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान राज्यात लसीकरणाचा जोर ओसरला असून सुमारे एक कोटी ६४ लाख नागरिकांनी दुसऱ्या मात्रेकडे पाठ फिरवली आहे.
राज्यात तिसरी लाट ओसरताच लसीकरणाचे प्रमाणही घटले आहे. तिसऱ्या लाटेआधी सुमारे एक कोटी नागरिकांनी दुसऱ्या मात्रेची नियोजित वेळ उलटून गेली तरी ती घेतली नव्हती. तिसऱ्या लाटेनंतर यात आणखी भर पडली असून दुसरी मात्रा न घेणाऱ्यांचे प्रमाण सुमारे एक कोटी ६४ लाखांवर गेले आहे. यात कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या एक कोटी २८ लाख, तर कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्या सुमारे ३६ हजार नागरिकांचा समावेश आहे. यात दुसरी मात्रा न घेणारे सर्वाधिक सुमारे १४ लाख नागरिक पुण्यातील आहेत. या खालोखाल नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि ठाण्यातील सुमारे नऊ लाख नागरिकांचा समावेश आहे. मुंबईत ८ लाख ६७ हजार नागरिकांनी दुसरी मात्रा घेतलेली नाही.
राज्यभरात पहिल्या मात्रेचे लसीकरण सुमारे ९२ टक्के झाले आहे. परंतु दोन्ही मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण ७१ टक्के आहे. १८ वर्षांवरील एकूण लसीकरणामध्ये नंदुरबार, अकोला, बीड, बुलढाणा, औरंगाबाद, यवतमाळ, अमरावती, उस्मानाबाद, जालना, जळगाव आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये ६० टक्क्यांपेक्षाही कमी नागरिकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या आहेत.
चौथ्या लाटेबद्दल शंका?
येत्या जून महिन्यात करोनाची चौथी लाट येण्याचे संकेत आयआयटी, कानपूरच्या गणिती प्रारुपावर आधारित अभ्यासामध्ये दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भीती व्यक्त होऊ लागली. तज्ज्ञांनी मात्र या अभ्यासाच्या विश्वासार्हतेबाबत शंका उपस्थित केल्या आहेत.
करोनाबाबत आत्तापर्यंत गणिती प्रारुपानुसार केलेले सर्व अंदाज चुकीचे ठरले आहेत, असा अनुभव आहे. आयआयटी- कानपूरचा हा अभ्यास कोणत्याही संशोधनात्मक नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेला नाही. अभ्यास प्रसिद्ध झाल्यावर याबाबत विचार केला जाईल. तूर्तास याला विशेष महत्त्व न देता करोना प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे गरजेचे आहे, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.
करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे डेल्टा संपुष्टात येण्यास मदत झाली आहे. सध्या ओमायक्रॉनचा प्रभाव असून तुलनेने हा विषाणू प्रकार फारसा घातक नाही. सध्या पुढील लाट कधी येणार यावर चर्चा करून लोकांना भयभीत करण्यापेक्षा प्रतिबंध करण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. विशेषत: लसीकरण वाढविण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवे, असे मत कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले. करोना कृती दलाची पुढील बैठक सोमवारी होणार असून यात आयआयटी- कानपूरच्या अभ्यासाबाबत चर्चा केली जाणार आहे.
लसीकरण अनिवार्य
करोनाची तिसरी लाट ओसरली असून पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेप्रमाणे शेपूट मागे राहिलेले नाही. या लाटेत बहुतांश बाधित झाले असल्यामुळे आणि लसीकरण मोठय़ा प्रमाणात झाले असल्याने प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. येत्या काळात करोनाचे नवे घातक उत्परिवर्तन न आल्यास पुढील सहा ते नऊ महिने कोणताही धोका नाही. लसीकरण न झालेल्या भागामध्येच करोनाचे नवे उत्परिवर्तन होण्याची शक्यता आहे. त्यात आपल्याकडे अजूनही १५ वर्षांखालील बालकांसाठी लसीकरण सुरू झालेले नाही. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्धक मात्रेच्या लसीकरणाचे प्रमाणही कमी राहिले आहे. त्यामुळे लसीकरण जलद गतीने पूर्ण करायला हवे, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.
मुंबईसह राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव असल्यामुळे आता आर्थिक, शैक्षणिक बाबी कशा सुरळीतपणे सुरू होतील, याकडे लक्ष द्यायला हवे. लसीकरणाबाबतच्या साक्षरतेवर भर कायम ठेवणे आवश्यक आहे, असे डॉ. पंडित यांनी सांगितले.
मुखपट्टी सहा महिने अनिवार्य
राज्यात अद्याप करोना विषाणू पूर्णपणे नष्ट झालेला नाही. साथीची वाटचाल अंतर्जन्य स्थितीकडे होत असली तरी मुखपट्टीसह अन्य करोना प्रतिबंधात्मक उपायांचा वापर पुढील सहा महिने करणे आवश्यकच असल्याचे डॉ. शशांक जोशी यांनी स्पष्ट केले.
पहिल्या मात्रेतही मागे
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे नऊ लाख ४३ हजार नागरिकांनी पहिली मात्राही घेतलेली नाही. या खालोखाल नाशिक, जळगाव, नांदेड, नगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतील नागरिकांनी पहिल्या मात्रेकडे पाठ फिरवली आहे.