लाचलुचपत विभागाच्या नाशिक येथील पथकाने अहमदनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे.१ कोटींच्या लाचखोरी प्रकरणात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. रस्ते आणि इतर विकासकामांचं बिल काढण्यासाठी ही लाच मागितली होती. याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. अहमदनगर एमआयडीसीतील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. यानंतर संबंधित प्रकरणात सहभागी असणारे धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ यांनाही अटक करण्यात आली.
विविध मीडिया रिपोर्टनुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका ठेकेदाराकडे १ कोटींची लाच मागितली होती. अहमदनगर परिसरात रस्त्यांसह विविध विकासकामांचं तीन ते साडेतीन कोटींचं बिल काढण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. अहमदनगर एमआयडीचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांनी ही लाच मागितली होती. यामध्ये अहमदनगरचे तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांचाही हिस्सा होता. वाघ यांच्या सहीशिवाय संबंधित बिलं निघणार नव्हती. त्यामुळे ही लाच मागण्यात आली होती.
हेही वाचा- “भारतात कधीही कुणालाही अटक होऊ शकते, जामीनही मिळणार नाही”, सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलांचं विधान
याबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, २२ ऑक्टोबर रोजी संबंधित घटनेची पुष्टी करण्यात आली होती. सुरुवातीला या लाचखोरीबाबत वाटाघाटी झाल्या. ७५-८५ लाखांपासून ही वाटाघाटी सुरू होती. दरम्यान, आम्हाला तत्कालीन उपविभागीय अभियंत्याविरोधात चांगले पुरावे मिळाले. वाटाघाटी झाल्यानंतरही आरोपींनी एक कोटी रुपयांची मागणी कमी केली नाही. शुक्रवारी (३ नोव्हेंबर) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास नाशिक पथकाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपी सहाय्यक अभियंत्याला रंगेहात पकडलं.