चिपळूण येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आतापर्यंत एक कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. कोकण विभागातील १५ आमदारांनी दिलेली प्रत्येकी ५ लाख रुपये आणि राज्य शासनातर्फे देण्यात आलेला २५ लाख रुपये अशी ही आकडेवारी असून साहित्य संमेलनांच्या इतिहासात सरकारी तिजोरीतून जमा झालेली ही बहुधा सर्वात जास्त रक्कम आहे.  दरम्यान, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हेही या संमेलनास उपस्थित राहणार आहेत.
या व्यतिरिक्त स्थानिक नगरपालिका, बॅंका आणि ‘युटोपिया’ कन्स्ट्रक्शन्ससह विविध उद्योगांनीही संमेलनाला सढळपणे मदत केली आहे. त्यामुळे यजमान संस्थेच्या भावी प्रकल्पांच्या दृष्टीने आशादायक वातावरण निर्माण झाले आहे.
प्रसिद्ध चित्रकार आणि व्यंगचित्रकारांचा सहभाग असलेला ‘आमच्या रेषा बोलती भाषा’ हा परिसंवाद संमेलनात येत्या १२ जानेवारी रोजी दुपारी अडीच ते चार या वेळात होणार आहे. या परिसंवादाला ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मात्र त्यांचा प्रत्यक्ष सहभाग कसा आणि किती राहील, याचा तपशील अजून ठरलेला नाही.
१०० हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन
दरम्यान संमेलनाच्या तीन दिवसांमध्ये स्मरणिकेसह १०० हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन होणार असून त्यासाठी नाटककार वसंतराव जाधव यांच्या नावाने स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे. रेखा देशपांडे यांनी संपादन केलेल्या संमेलनाच्या स्मरणिकेमध्ये कोकणातील कर्तबगार व्यक्ती, संस्था, भारतरत्न किताबाचे मानकरी इत्यादीबाबत माहिती, यजमान संस्था लोकमान्य टिळक् स्मारक वाचन मंदिराचा इतिहास आणि कार्य, रत्नागिरी जिल्ह्याचा सामाजिक व स्वातंत्र्य लढय़ाचा इतिहास, कोकणातील लोककलाकार इत्यादी विषयांचा समावेश आहे.
त्याचबरोबर ‘कोकण काव्यातून’ या डॉ.रेखा देशपांडे यांनी संपादित केलेल्या पुस्तिकेचे आणि रत्नागिरी जिल्ह्य़ातील लेखकांच्या सूचीचेही प्रकाश संमेलनात होणार आहे.

Story img Loader