समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून नागपूरहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणा-या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक समृद्धी महामार्गाच्या भुयारी पुलाखाली कोसळला. हा अपघात शुक्रवारी दुपारी धामणगाव रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण या गावाजवळ घडला. अपघातात एक जण जागीच ठार झाला.
हेही वाचा >>> Video : वृद्ध कलावंतांनी काढली ‘समाजकल्याण’ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
नागपूरवरून लोखंडी साहित्य घेऊन हा ट्रक मुंबईच्या दिशेने निघाला होता. समृद्धी महामार्गावर निमगव्हाण नजीक भुयारी पुल आहे. या पुलावरून हा ट्रक खाली कोसळला. पण, ट्रकचा काही भाग महामार्गाच्या कठड्यावरच अडकून होता. या ट्रकमधून चालकासह दोघे जण प्रवास करीत होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा >>> चंद्रपूर : तरूणींची छेड काढणारा ‘मजनू’ थेट कोठडीत
मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलीस पथकही लगेच पोहचले. अपघातात एक जण जागीच ठार झाला. एका जखमी व्यक्तीला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग हा घातक ठरू लागला असून वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातही यापुर्वी भीषण अपघात घडले आहेत.