नक्षलवादी बनून आदिवासी बांधवांचे गळे कापणाऱ्या आमच्या बापाला या देशविघातक चळवळीतून बाहेर काढा. बाप नक्षलवाद्यांसोबत जंगलात निघून गेल्याने कुटुंबाची पुरती वाताहत झाली आहे. कसेही करा, पण त्याला जंगलातून बाहेर काढा, ही आर्त हाक आहे विज्ञान शाखेला अकरावीत शिकणाऱ्या व भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न बघणाऱ्या एका नक्षलवाद्याच्या मुलीची! नवजीवन योजनेच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी थेट नक्षलवाद्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला. त्यातूनच ही व्यथा समोर आली आहे.
 नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात होरपळणाऱ्या कुटुंबीयांसाठी राज्य शासनाने नवजीवन योजना सुरू केली आहे. होळीच्या पावन पर्वावर नवजीवन योजनेच्या कार्याचा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी शुभारंभ केला. त्यानिमित्ताने नक्षलवादी चळवळीत सक्रिय विभागीय कमांडरपासून, तर साध्या दलममध्ये सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गेल्या कित्येक वर्षांपासून नक्षलवादी चळवळीत सक्रिय असलेल्या एका विभागीय समिती कमांडरच्या कुटुंबीयांची अक्षरश: वाताहत झालेली आहे. पोलीस अधीक्षक हक यांनी या कुटुंबाची भेट घेतल्यावर विज्ञान शाखेला अकरावीत शिक्षण घेणाऱ्या त्याच्या मुलीने तिला भेडसावणाऱ्या विविध समस्या व भविष्यातील स्वप्ने कथन केली. गावात फिरायला भीती वाटणाऱ्या या मुलीने चांगल्या गुणांसह अकरावीची परीक्षा उत्तीर्ण केली.
आता तिला विज्ञान शाखेतच बारावीची परीक्षा द्यायची असून भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे, परंतु वडील नक्षलवादी चळवळीत सक्रिय आणि घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची. अशा परिस्थितीत शिक्षणासाठी म्हणून बहीण व लहान भावासह ती आत्याच्या घरी वास्तव्याला आहे. वडिलांनी ही चळवळ सोडावी आणि ते सर्वसामान्य जीवन जगले तर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा तिला आहे. सर, तुम्ही काहीही करा, पण माझ्या वडिलांना या देशविघातक चळवळीतून बाहेर काढा, अशी आर्त हाक तिने पोलीस अधीक्षकांना दिली. वडिलांनी चळवळ सोडली तर अख्ख्या कुटुंबाचे भले होईल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. कुटुंबीयांपासून दुरावून नक्षलवादी दलममध्ये सामील झालेल्यांना परत बोलावून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि आत्मसमर्पणास प्रवृत्त करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने ही नवजीवन योजना सुरू केली आहे. अन्य एका नक्षलवाद्याच्या मुलीची भेट घेतली असता तिनेसुद्धा औद्योगिक प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. या योजनेच्या माध्यमातून नक्षलवादी चळवळीत सामील झालेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन संवाद साधला जाईल व त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी पत्रकार परिषदेत दिली. नक्षलवादी दलममध्ये सामील झाल्यानंतर वर्षांनुवष्रे नक्षलवादी कुटुंबात परत येत नाहीत अन् त्यांची कुटुंबीयांशी भेटही होत नाही. या चळवळीत जाण्याने अनेकांचे कुटुंब भरकटले जाते. त्यामुळे चळवळीत गेलेल्यांना परत बोलावण्यासाठी व आत्मसमर्पणास प्रवृत्त करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने नवजीवन योजना हा उपक्रम हाती घेतला आहे. ही योजना १ ते ७ एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणार असून, यादरम्यान नक्षलवादी कुटुंबीयांच्या गावात जाऊन त्यांची भेट घेण्यात येणार आहेत व नक्षलवादी सदस्याला परत बोलावण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना आवाहन करण्याची समज दिली जाणार आहे. या योजनेचा एक भाग म्हणून नुकतीच दोन नक्षलवादी सदस्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना भेटवस्तू देण्यात आली. त्यांच्याशी संवाद साधून अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. या चळवळीतील सदस्यांनी आत्मसमर्पण केल्यास शासनातर्फे मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. अशा नक्षलवाद्यांना ७५ हजार रुपयांची मदत देण्याची तरतूद असून दलम कमांडरला २ लाख, डिव्हिजन कमिटी मेंबर ४ लाख, झोनल कमांडर २ लाख, स्टेट समिती सदस्य ६ ते ७ लाख, केंद्रीय समिती सदस्य ८ लाखांची तरतूद असून सामूहिक आत्मसमर्पण करणाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत देण्यात येणार आहे. शिवाय, त्यांना घरकूल, प्रशिक्षण, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विशेष अभियान पथकाचे राहुल शेठ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा